परमानंद हेवाळेकरला अटक; जामिनावर सुटका
By admin | Published: September 11, 2016 11:14 PM2016-09-11T23:14:48+5:302016-09-11T23:17:06+5:30
कमालीची गुप्तता पाळून पोलिसांनी केले न्यायालयात हजर
कुडाळ : तीन वर्षांपूर्वी विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेला महादेवाचे केरवडे येथील फरार आरोपी परमानंद सावळाराम हेवाळेकर याला शनिवारी कुडाळ पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक करीत रात्री उशिरा कुडाळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर त्याची मुक्तता केली.
महादेवाचे केरवडे येथील परमानंद हेवाळेकर हा आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एक विवाहित महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास घुसला होता. या प्रकरणी महिलेने कुडाळ पोलिसांत २०१३ मध्ये तक्रार दिली होती. आरोपी परमानंद हेवाळेकर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिस अटक करतील या भीतीने परमानंद हा गेले तीन वर्षे गाव सोडून फरार होता. अलीकडेच कुडाळ न्यायालयाने त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. तशी नोटीसही त्याच्या घरावर चिकटवण्यात आली होती.
मात्र, तत्पूर्वीच तो आपल्या पत्नीसह गणेशमूर्ती घेऊन मंत्रालयाच्या समोर गावाने आपणास बहिष्कृत केले असे म्हणत उपोषणास बसला होता. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे रत्नागिरीचे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील हे गेले चार दिवस कुडाळ येथे ठाण मांडून असून, या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. दरम्यान, फरार असलेला परमानंद हेवाळेकर हा गेले चार दिवस कुडाळ पोलिसांसोबतच असून, त्याला त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी रात्री अटक
करण्यात आली आहे. त्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. याची माहितीही कुणालाच देण्यात आली नाही. एवढ्या रात्री अटक करून न्यायालयात हजर करण्याचे कारण काय, असाच सवाल आता उपस्थित होत असून, पोलिसही या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. न्यायालयाने हेवाळेकर यांची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.(प्रतिनिधी)