अरुणा प्रकल्पग्रस्तांचे शुक्रवारी आंदोलन, पुनर्वसन उपायुक्तांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:13 PM2019-11-07T16:13:37+5:302019-11-07T16:16:07+5:30
अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीला आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिक प्रशासनाकडून निराशा झाल्याने त्यांनी आता आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे.
वैभववाडी : अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीला आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिक प्रशासनाकडून निराशा झाल्याने त्यांनी आता आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी प्रकल्पग्रस्त आयुक्त कार्यालयासमोर दे धडक, बेधडक आंदोलन छेडणार आहेत. जोपर्यंत घळभरणीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही; तोपर्यंत अशा पध्दतीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पुनर्वसन उपायुक्तांच्या भेटीत निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
नियोजित आंदोलनाच्या अनुषंगाने पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अरुण अभंग यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने भेट घेत त्यांना आंदोलनासंबंधी निवेदनाद्वारे पूर्वकल्पना दिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, माजी सरपंच सुरेश नागप, सूर्यकांत नागप, विनेश नागप, तुकाराम नागप, शांताराम नागप, संतोष नागप आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेताच अरुणा प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली.
या धरणाच्या पाण्यात अनेक घरे बुडाली. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीवर ठाम राहत गेले चार महिने काही प्रकल्पग्रस्त विविध प्रकारची आंदोलन छेडत आहेत. पालकमंत्र्यांचे ते आश्वासन हवेत विरून गेले.
प्रकल्पस्थळ, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडल्यानंतर पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी जलसंपदा मंत्र्यांसोबत पुनर्वसन गावठाणात बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासनही हवेत विरून गेल्याने प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांनी आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे.
येत्या शुक्रवारी आयुक्त कार्यालयामध्ये विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही संधी साधत त्या बैठकीला जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्याच दिवशी आंदोलन छेडण्याचा प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतला आहे.