जलसंपदा राज्यमंत्र्यांसमोर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:37 AM2020-01-17T10:37:21+5:302020-01-17T10:41:10+5:30
पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली.
वैभववाडी : पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवार २१ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे आंदोलने करू नये, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्तांना केले.
सर्व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तसेच पुनर्वसन अपूर्णावस्थेत असताना प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्याखाली बुडाली असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.
या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही; तोपर्यंत धरणाचे पुढील कोणतेही काम करू नये, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त गेल्या सात महिन्यांपासून निरनिराळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत.
परंतु, प्रशासनाकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, अजय नागप, सूर्यकांत नागप, रामचंद्र नागप, मनोहर तळेकर, सुरेश नागप, दत्ताराम नागप, सुभाष नागप, दिलीप नागप, अशोक नागप, लताताई बांद्रे, सुचिता चव्हाण, आरती कांबळे यांनी मंगळवार १४ रोजी मुंबईत राज्यमंत्री कडू यांची भेट घेतली.
या भेटीत प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यावेळी येत्या मंगळवारी (ता. २१) अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाविषयी बैठक घेण्यात येईल. तोपर्यत कुणीही प्रकल्पग्रस्तांने जलसमाधी, आत्मदहन अशाप्रकारचे आंदोलन करू नये, असे आवाहन मंत्री बच्चू कडू यांनी केले असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी दिली.
लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणाऱ्या अरुणा प्रकल्पग्रस्तांना वैभववाडी पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे हे हेतूपुरस्सर त्रास देत आहेत. त्यांसदर्भात यापूर्वी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून आता कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक नवल बजाज यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी यावेळी दिली.