अरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:23 PM2019-12-19T18:23:34+5:302019-12-19T18:25:20+5:30
प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
वैभववाडी : प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
अरुणा प्रकल्पबाधित काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाशी लढा सुरू आहे. दरम्यान, अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली होती.
त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांची सभा घेण्याचे मान्य केले होते. दोन तारखांना निश्चित केलेल्या सभा रद्द झाल्यामुळे बुधवारी सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, श्रीराम बांद्रे, सूर्यकांत नागप, विलास कदम, वामन बांद्रे, संदीप बांद्रे, पंकज कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या उजवा आणि डाव्या कालव्यांचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच भुईबावडा येथील मुख्य कालव्याचे काम बंद पाडल्याचा दावाही माध्यमांकडे केला.
मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात : तानाजी कांबळे
आम्हांला न्याय मिळत नसल्यामुळे कोणतेही काम करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचे समजले. जर पोलीस काम सुरू करीत असतील तर आमच्या मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या मागण्यांसाठी आम्हांला पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिला आहे.
अरुणा प्रकल्पाचे कोणतेही काम कुणी बंद करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम लवकरात पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे कुणी काम बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही काम बंद ठेवणार नाही. वेळेत काम पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कालव्याचे काम आम्ही सुरूच ठेवले आहे, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले. तर काही लोक काम बंद करण्यास सांगत होते. मात्र, कालव्यांचे काम दिवसभर सुरू होते. उद्याही सुरुच राहील असे, सहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी स्पष्ट केले आहे.