समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन रिंढे, डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे

By सुधीर राणे | Published: December 8, 2023 12:50 PM2023-12-08T12:50:50+5:302023-12-08T12:51:14+5:30

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजन 

As the President of Samaj Sahitya Vich Sammelan, Prof. Nitin Rindhe, Dr. Bhalchandra Mungekar Chief Guest, Organized in Mumbai on 16th December | समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन रिंढे, डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे

समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन रिंढे, डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे

कणकवली: सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान गेली काही वर्ष  साहित्यिक उपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक आणि साहित्य संशोधक प्रा. डॉ.नितीन रिंढे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू, लेखक आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

शनिवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह प्रा.वैभव साटम यांनी दिली.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान दरवर्षी समाज साहित्य विचार संमेलन आयोजित करते. 'समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते'  हे ब्रीदवाक्य या संमेलनाचे असल्यामुळे संमेलनाला समाज साहित्य विचार संमेलन असे शीर्षक देण्यात आले आहे. हे तिसरे संमेलन असून ते मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे काम महाराष्ट्र व्यापी व्हावे आणि या कामात महाराष्ट्रातील साहित्य संस्कृती क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना सहभागी करून घेता यावे तसेच कोकणातील कवी लेखकांबरोबर महाराष्ट्रातल्या इतर भागातीलही कवी लेखकांना मंच उपलब्ध करून द्यावा म्हणून हे संमेलन मुंबईत घेण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले प्रा.डॉ. नितीन रिंढे हे मराठीतील महत्त्वाचे कवी समीक्षक आणि साहित्य संशोधक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तर संमेलनाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरू, राज्यसभा सदस्य आणि देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्राचार्य डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात गुरुवर्य इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत  चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना तर काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्काराने विजय जावळे (बीड) यांना आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्काराने डॉ अनिल धाकू कांबळी (कणकवली ,नांदगाव) यांना डॉ.मुणगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

यावेळी  जयंत पवार कथा स्पर्धा पुरस्कारातील विजेते कथाकार डॉ.ऐश्वर्या रेवडकर (बार्शी) आणि जयदीप विघ्ने (बुलढाणा) यांनाही गैरविण्यात येणार आहे. या पहिल्या सत्रात समाज साहित्य प्रतिष्ठानच्या वार्षिक संमेलन विशेषांकाचे तसेच फोंडाघाट येथील कवी संतोष जोईल यांच्या  'काहीच सहन होत नाही' या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींच्या सहभागाने कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो ( वसई) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात अविनाश गायकवाड (मुंबई), वर्जेस सोलंकी, फेलेक्स डीसोझा,महेश लिला पंडित, संगीता अरबुने (विरार), रमेश सावंत, विजय सावंत (मुंबई), जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर ,औरंगाबाद), अंजली ढमाळ, बालिका ज्ञानदेव (पुणे), प्रियदर्शनी पारकर, डॉ.दर्शना कोलते, संतोष जोईल, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, अँड मेघना सावंत, अँड.प्राजक्ता शिंदे (सिंधुदुर्ग) आदींचा समावेश आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी  प्रा.संजीवनी पाटील , प्रा.तुषार नेवरेकर यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन मातोंडकर आणि साटम यांनी केले आहे.

Web Title: As the President of Samaj Sahitya Vich Sammelan, Prof. Nitin Rindhe, Dr. Bhalchandra Mungekar Chief Guest, Organized in Mumbai on 16th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.