असनिये गाव ‘धनेश’ संवर्धन केंद्र
By admin | Published: November 6, 2015 11:16 PM2015-11-06T23:16:24+5:302015-11-06T23:40:11+5:30
राज्य जैवविविध मंडळाची मान्यता : संवर्धनासाठीच्या उपक्रमाला मिळणार बळ
बांदा : जैवविविधतेने संपन्न असलेल्या असनिये गावात दुर्मीळ ‘धनेशी’ पक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविध मंडळाने असनिये गावाला ‘धनेश संवर्धन केंद्र’ म्हणून मान्यता दिली आहे. या मंडळाचे वरिष्ठ संशोधक डॉ. राहुल मुंगीकर यांनी नुकतीच गावाला भेट देऊन येथील जैवविविधतेची माहिती घेतली. शासनाने धनेश संवर्धन केंद्र म्हणून मान्यता दिल्याने या पक्षाच्या संवर्धन मोहिमेला बळकटी मिळणार आहे.
डॉ. राहुल मुंगीकर यांनी येथील निसर्गसौंदर्याचे कौतुक करीत गावातील दुर्लक्षिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव देण्याचे सुचविले. यावेळी त्यांनी ग्रामीण पर्यटन विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत सरपंच सावंत यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी समिती सदस्य एम. डी. कावळे, शरद सावंत, दाजी गावडे, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, आत्माराम सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
असनियेत विपुल प्रमाणात वनौषधी
सरपंच गजानन सावंत यांनी गावातील पर्यटन स्थळ व धनेश पक्षी संवर्धनाबाबत माहिती दिली. गावात दोन बारमाही वाहणारे धबधबे आहेत. तसेच गावात दीड कि.मी. लांबीची भल्यामोठ्या दगडांनी रचलेली प्राचीन गुहा आहे. त्या गुहेत झऱ्यांच्या पाण्याचा गारवा अनुभवता येतो. गावात नैसर्गिक पाण्याचे ८३ स्रोत आहेत. नारळ, फोफळीच्या बागा, हिरवीगार वनराई व परिसरातील जंगलात विपुल प्रमाणात वनौषधी आहेत. त्यामुळे गावात पर्यटनाला वाव आहे.
धनेश केंद्र म्हणून मान्यता मिळणे आवश्यक
धनेश पक्षी हा दुर्मीळ प्रजातीत मोडणारा असून, या पक्षाचे अस्तित्व असनिये परिसरात आढळले आहे. या पक्षाच्या संवर्धनासाठी असनिये गावात ग्रामजैवविविधता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून धनेश पक्षांच्या संवर्धनासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवरच असनिये गावाला धनेश केंद्र म्हणून मान्यता मिळाल्याने धनेश पक्षाच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शासनस्तरावरून निधी प्राप्त होणार आहे.