आशा वर्कर्स युनियनचा मोर्चा, मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:02 PM2019-06-05T13:02:19+5:302019-06-05T13:04:42+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव्य मोर्चा काढला.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव्य मोर्चा काढला.
एक रूपयाचा कढीपत्ता...सरकार झाले बेपत्ता यासह लक्षवेधी व एका पेक्षा एक सरस सरकार विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आपल्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सचिव विजयाराणी पाटील, खजिनदार निलीमा लाड, प्रियांका तावडे, नम्रता वळंजू, विद्या सावंत, वर्षा परब यासह विविध पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रखरखत्या उन्हात देखील आपल्या न्याय मागण्यांसाठी महिला आक्रमक पवित्र्यात दिसत होत्या.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण धोरण बंद करा, आशांना एएनएम पदावर बढती द्या, ५ हजार दिवाळी भेट द्या, मिटिंगसाठी प्रवास खर्च व भत्ता मिळावा, कुटुंब नियोजन लाभार्थी भत्ता १५० वरून ३०० रुपये करावा, आशांना सायकली पुरविण्यात याव्यात, केरळ व इतर राज्यांप्रमाणे आशा व गटप्रवर्तक यांना सेवासुविधांचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आशा व गटप्रवर्तकांच्या वरील मागण्यांबाबत मंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा झाली. आश्वासन मिळाली. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. लवकरात लवकर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनात आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हा परिषद भवन असा मोर्चा काढला.