असलदे सोसायटीचे प्रकाश परब अध्यक्ष
By admin | Published: March 31, 2015 09:20 PM2015-03-31T21:20:20+5:302015-04-01T00:15:21+5:30
आवाजी मतदानाने निवडणूक : उपाध्यक्षपदी दिनकर दळवी; असलदे सोसायटीची प्रथमच निवडणूक
नांदगांव : असलदे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रकाश परब, तर उपाध्यक्षपदी दिनकर शंकर दळवी यांची आवाजी मतदानाने सोमवारी निवड करण्यात आली. आवाजी की गुप्त मतदान करायचे, यावरून आठ विरुद्ध पाच असे बहुमत मिळाल्याने आवाजी मतदान घेण्यात आले. यामधील १२ उमेदवार हे बिनविरोध, तर एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
असलदे सोसायटीची गेली अनेक वर्षे निवडणूक बिनविरोध होते. याही वर्षी १३ पैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या तर एका जागेसाठी १५ मार्चला भिसाजी तांबे व अनंत तांबे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये भिसाजी तांबे हे विजयी झाले. त्यानंतर सोमवारी अध्यक्ष निवडीसाठी दुपारी ३ नंतर सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी प्रकाश राजाराम परब विरुद्ध लक्ष्मण गंगाराम लोके, तर उपाध्यक्ष पदासाठी दिनकर शंकर दळवी विरुद्ध सुरेश राजाराम मेस्त्री यांच्यात लढत झाली.
त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश परब व उपाध्यक्ष दिनकर दळवी आठ विरुद्ध पाच अशा मत फरकाने विजयी झाले, तर असलदे विविध कार्यकारी सोसायटी कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण गंगाराम लोके, सुरेश राजाराम मेस्त्री, परशुराम रत्नू परब, विठ्ठल जानू खरात, कृष्णा जयराम डामरे, भिसाजी बाबी तांबे, सुनीता भगवान नरे, वंदना भास्कर हडकर, भगवान सुरेश लोके, विलास मनोहर जांभळे, बाळा भाऊ खरात यांची निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून फळसणकर यांनी काम पाहिले, तर सचिव मुसळे यांनी सहकार्य केले. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन उपस्थितांकडून करण्यात आले. यावेळी कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे आत्माराम गोसावी व झोरे उपस्थित होते. (वार्ताहर)
वाद मिटला
संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर काही काळ दोन गटात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर किरकोळ धक्काबुक्कीत झाले होते.
यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले होते, मात्र काही जाणत्या नेत्यानंी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद अखेर मिटला. यावेळी कासार्डे आऊटपोस्टचे आत्माराम गोसावी व झोरे उपस्थित होते.
या वादासंदर्भात कासार्डे दूरक्षेत्रात विलास जांभळे आणि संतोष राजाराम परब यांनी एकमेकांविरोधात नोंद केली होती.