सहाय्यक अभियंत्याला धरले धारेवर, वीज वितरणचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:56 PM2019-06-06T19:56:22+5:302019-06-06T19:57:28+5:30
दोडामार्ग तालुक्यात सध्या वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. वाढीव बिलावरून मांगेली ग्रामस्थ मंगळवारी आक्रमक बनले होते. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता जीवन चराठे यांना धारेवर धरले.
दोडामार्ग : तालुक्यात सध्या वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. वाढीव बिलावरून मांगेली ग्रामस्थ मंगळवारी आक्रमक बनले होते. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता जीवन चराठे यांना धारेवर धरले.
सद्यस्थितीत घरगुती वापराचे मीटरचे बिल चौपट येत असल्याने अनेक ग्राहक तालुक्याच्या कार्यालयात येत आहेत. उपकार्यकारी अभियंता मंगळवारी कार्यालयात अनुपस्थित होते. मांगेली येथील ग्राहकांनी वाढीव बिलाबाबत कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक अभियंता चराठे यांना धारेवर धरले.
लतिका लक्ष्मण पराधी या घरात वास्तव्यास नसूनही त्यांचे १२ हजार रुपये बिल कसे काय देण्यात आले? याबाबत जाब विचारण्यात आला. त्यातच वीज बिल कमी करण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करू लागल्याने ग्रामस्थ आणखीनच संतप्त बनले होते. यावेळी गोपाळ गवस यांनी आक्रमक होत वीज बिल फाडून जाहीर निषेध व्यक्त केला.
शुक्रवारी मांगेली गावात जाऊन बिघाड झालेले मीटर दुरूस्त करून वाढीव वीज बिले कमी करून देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. तसेच जुने वीज मीटर बदलून देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी माजी सरपंच विजय गवसही उपस्थित होते.