एटीएम अपहार तीन वर्षांपासून
By admin | Published: September 23, 2015 11:45 PM2015-09-23T23:45:21+5:302015-09-24T00:03:11+5:30
शेवाळे यांची माहिती : साडेतेरा लाखांसह आठ गाड्या जप्त
कणकवली : एटीएम अपहार हा गेल्या दोन महिन्यांतील नसून, गेली तीन वर्षे सुरू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुख्य सूत्रधार कुणाल सावंत याने अत्यंत हुशारीने बॅँक आणि कंपनीला फसवून पैशांची फिरवाफिरवी केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चार कारसह आठ गाड्या जप्त केल्या असून, साडेतेरा लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली. रेल्वेच्या कॅश काऊंटरमधील अफरातफरीतून पहिल्यांदा एटीएम अपहार उघड झाला. त्यानंतर तपासात प्रत्यक्षात ही पैशांची फिरवाफिरवी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे. कुणाल सावंत याने दिलेल्या माहितीवरून पोलीस चक्रावले आहेत. अत्यंत हुशारीने कुणाल सावंत याने बॅँक आणि कंपनीला फसविल्याचे दिसून आले. एटीएम मशीनच्या तंत्राची माहिती मिळाल्याने त्याच्या आधारे कुणाल सावंत याने हव्या तशा बिल्स प्रिंट करून पैशांची फिरवाफिरवी केली.
बॅँकेला दाखविण्यासाठी आणि सीएमएस कंपनीला दाखविण्यासाठीच्या वेगळ्या अशा बिल्स कुणाल सावंत मशीनमधून काढत असे.
पैसे डिपॉझिट करण्याचा कालावधी वाढवून मधल्या काळात तो पैशांची फिरवाफिरवी करीत असे. मात्र, नेमके कशासाठी आणि कसे पैसे वापरले त्याचा अद्याप स्पष्टपणे खुलासा झालेला नाही. पोलिसांनी ९४ लाख ५६ हजारांपैकी आतापर्यंत साडेतेरा लाखांची रक्कम जप्त केली आहे. (प्रतिनिधी)
एफआयएस मुख्य कंपनी
बॅँक एटीएमसंबंधी सेवा देणारी देशस्तरावरील एफआयएस ही मुख्य कंपनी असून, त्याची सीएमएस इन्फोसिस्टीमस् ही उपकंपनी आहे, जी फक्त एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम करते.
दोघे उच्च शिक्षित
अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे हे दोन्ही उच्चशिक्षित आहेत. अक्षय सावंत हा मरीन इंजिनिअर असून, पोर्ट ट्रस्टची कामे करतो, तर संतोष पाटोळे हा एमबीए आहे. अक्षय सावंत हा कुणाल सावंत याचा चुलत भाऊ असून, कुणाल याने अक्षय याच्या आईच्या खात्यावर तीन वर्षांपूर्वी चार लाख रुपये जमा केले होते.