मिनीमहाबळेश्वरमधील वातावरण तापले
By admin | Published: April 14, 2015 01:07 AM2015-04-14T01:07:25+5:302015-04-14T01:10:30+5:30
कडकडीत उन्हाने
शिवाजी गोरे ल्ल दापोली
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी मिनी महाबळेश्वरात आपल्या सैनिकी छावण्या थाटल्या होत्या. कधी काळी ब्रिटीशांना खूप भावलेले मिनीमहाबळेश्वर दापोली अलीकडे कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे मिनी महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणाला सुद्धा जोरदार फटका बसायला सुरुवात झाली असून मिनीमहाबळेश्वर प्रचंड तापले आहे.
दापोलीच्या मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर कोकणच्या निसर्गसौंदर्याने ब्रिटीशांना तर चांगलीच भुरळ घातली होती. त्यामुळे महाबळेश्वर पाठोपाठ ब्रिटीशांनी दापोलीला पसंती दिली. थंड हवा लागूनच असलेला अरबी समुद्र यामुळे समुद्रमार्गे दळणवळणसुद्धा ब्रिटीशांना सोईची होती. समुद्रमार्गे जहाजाने हर्णेला जायचे व हर्णेतून दापोलीला बग्गी/घोडागाडीतून प्रवास करुन थंड हवेच्या ठिकाणी तळ ठोकायचा. दापोलीचे निसर्गसौंदर्य, थंड हवा, शांत समुद्रकिनारा ब्रिटीशांना भावल्याने दापोली मिनीमहाबळेश्वरला छावणीचे रुप आले होते. दापोलीतील आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात ब्रिटीश सैन्य व अधिकाऱ्यांच्या छावण्या होत्या. त्यामुळे याच मिनी महाबळेश्वरचे नाव कधीकाळी कॅम्प दापोली म्हणूनसुद्धा प्रचलित होते. ब्रिटीश काळात दापोली शहर नगरपालिकेचे शहर होते. पूर्वीच्या काळी दापोलीत नगरपालिका अस्तित्वात होती. अशी ही वैभवसंपन्न दापोली अनेकांना प्राचीन काळापासून आपल्या निसर्गसौंदर्यामुळे भावली आहे.
कोकणातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोली मिनीमहाबळेश्वर सर्वाधिक पसंती मिळू लागल्याने अनेकांनी दापोलीत जमीन-जागा खरेदी करायला सुरुवात केली व खऱ्या अर्थाने दापोलीच्या निसर्गसौंदर्यावर कुऱ्हाड कोसळायला सुरुवात झाली. दापोलीत अलीकडे मोठ्या प्रमाणावर जागा-जमिनींचे व्यवहार झाले व धनिक लोकांनी दापोली मिनीमहाबळेश्वरच्या जमिनीला सर्वाधिक पसंती दिल्यानंतर निसर्गसौंदर्याने नटलेले डोंगर, उघडे बोडके होवू लागले. जमिनी धनिकांनी खरेदी केल्यामुळे नैसर्गिक जंगलाची वृक्षतोड होवून मोठ्या प्रमाणावर आता गावागावात सिमेंटचे जंगल निर्माण होवू लागले आहेत. सिमेंटच्या जंगलामुळे व प्रचंड जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला असून मिनीमहाबळेश्वर तापू लागले आहे. दापोलीचे निसर्गसौंदर्य नष्ट होवू लागल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
दापोली मिनीमहाबळेश्वरची धनिकांना भुरळ पडत असल्याने अनेकांनी येथील समुद्रकिनाऱ्यावर सिमेंटचे जंगल उभे केले आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे डोंगर नष्ट होत असून, डोंगर पोखरुन सिमेंटच्या बंगल्यांची संख्या वाढत आहे. थंड हवेचे ठिकाण मिनीमहाबळेश्वरची भुरळ असल्याने अनेकांनी जमिनी खरेदी करुन नैसर्गिक सौंदर्य नष्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मिनीमहाबळेश्वरचे पर्यावरण संतुलन ढासळले असून, येथील थंड हवेच्या ठिकाणाचे तापमान आता ४० अंश डिग्रीच्या जवळपास जाऊन पोहोचल्याने पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करु लागले आहेत.