भ्रष्टाचार उघड केल्याने हल्याचा कट, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा खळबळजनक दावा
By अनंत खं.जाधव | Published: January 9, 2024 03:59 PM2024-01-09T15:59:02+5:302024-01-09T16:00:44+5:30
कटात बांधकाम अधिकाऱ्यांचा समावेश
सावंतवाडी : आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आपण आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी व ठेकेदारांची एका हॉट मिक्स प्लांटवर पार्टी झाली. या पार्टीत आपल्यावर हल्याचा कट रचण्यात आला असून या कटाचा सूत्रधार सार्वजनिक बांधकामचा एक अधिकारीच असल्याचा खळबजनक दावा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
ते सोमवारी सावंतवाडीत बोलत होते. यावेळी त्यांनी असे किती ही हल्याचे प्रयत्न झाले तरी मागे हटणार नसून आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचाराचा कशाप्रकारे हब झाला हे पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, महादेव राऊळ उपस्थित होते.
साळगावकर म्हणाले, काही दिवसापूर्वी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता.यात मागील दहा वर्षांत आंबोली घाटात झालेला भ्रष्टाचार उघड व्हावा अनेक ठिकाणी कामे न करता पैसे काढण्यात आले असून याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. या मागणी नंतर पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी हा अर्ज दाखल करून घेत बांधकाम विभागांकडून तशी माहितीही घेण्यास सुरुवात केली आहे.मात्र बांधकाम विभाग सध्या ही माहीती देण्यास टाळाटाळ करीत आहे. पण मी गप्प बसणार नाही.याचा छडा लागला पाहिजे म्हणून सतत पाठपुरावा करणार असल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान हा भ्रष्टाचार उघड करत असल्यानेच आठवड्या पूर्वी काहि ठेकेदार व बांधकाम विभागातील एक अधिकारी यांच्यात एक बांदा येथे पार्टी झाली या पार्टीत माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला आहे.याची माहिती मला लागली त्यानंतर याबाबत मी स्वता पोलिसांना माहिती दिली असून कोणताही तक्रार अर्ज दिला नाही.तसेच ज्या बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कट रचण्यात आला तो अधिकारी बरीच वर्षे एकाच ठिकाणी असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ही आपण बांधकाम विभागाकडे करणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापूर्वी ही माझ्यावर असे हल्ले झाले असून मी अशा हल्याना घाबरत नाही पण जे भ्रष्टाचाराचे प्रकरण हाती घेतले ते तडीस लावणार असा इशारा ही साळगावकर यांच्याकडून देण्यात आला आहे.