वेतोशीत प्रक्षुब्ध जमावाचा घरावर हल्ला

By admin | Published: January 19, 2015 12:03 AM2015-01-19T00:03:04+5:302015-01-19T00:30:23+5:30

छेडछाड प्रकरणाचे पडसाद : एक दुचाकी पेटवली, दोन दुचाकींची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

The attack on the house of the Vattoit-busted crowd | वेतोशीत प्रक्षुब्ध जमावाचा घरावर हल्ला

वेतोशीत प्रक्षुब्ध जमावाचा घरावर हल्ला

Next

रत्नागिरी : तालुक्यातील वेतोशी धनगरवाडीत पूर्ववैमनस्यातून सुमारे दीडशे लोकांच्या जमावाने एका कौलारू घराला चारही बाजूने घेरून घरावर जोरदार दगडफेक केली. अंगणातील एक दुचाकी पेटवली, तर अन्य दोन दुचाकींची तोडफोड केली. कपडे, खाट, अंथरूण यांचे नुकसान केले. तब्बल तासभर सुरू असलेल्या या धुडगुसामुळे घरातील नऊ महिन्यांच्या मुलीसह पाचजण जीव मुठीत धरून पत्र्याच्या छताखाली लपून राहिले. काल, शनिवारी रात्री अकरा वाजता हा प्रकार घडला असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल केला, तर दोन तरुणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेसात वाजता जगदीश झोरे याने वेतोशी येथील तुकाराम तानाजी रांबाडे (वय ३९) यांना पूर्वीचा राग मनात धरून रत्नागिरीतील कोकणनगर येथे अडविले. त्यांना मारहाण केली व शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकीही दिली. मारहाण झालेल्या तुकाराम रांबाडे यांनी वेतोशीत जाऊन झाला प्रकार गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भावे यांना सांगितला. याप्रकरणी भावे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मारहाण करणाऱ्या झोरे याच्याविरोधात आज, रविवारी पोलिसांत गुन्हा दाखल करायचे ठरविण्यात आले. त्याचदरम्यान ९ जानेवारी २०१५ रोजीही गावातीलच सीताराम गणपत रांबाडे याला जगदीश कृष्णा झोरे व मंगेश कृष्णा झोेरे यांच्याकडून वाटेत अडवून मारहाण व शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे झोरे कुटुंबाविरोधातील वातावरण अधिकच तापले.
दमदाटीचा हा विषय गावात सर्वत्र वाऱ्यासारखा पसरल्याने संतप्त ग्रामस्थ काल रात्री दहा वाजल्यापासूनच कृष्णा झोरे यांच्या घराभोवती जमा झाले. घराला वेढा घातल्यासारखीच स्थिती निर्माण झाली. साडेदहा वाजल्यानंतर प्रक्षुब्ध जमावाकडून झोरे यांच्या कौलारू घरावर जोरदार दगडफेकीस सुरुवात झाली. त्यावेळी झोरे यांच्या ज्या दोन मुलांबाबत ग्रामस्थांची तक्रार होती, ते घरात नव्हते. घरात नऊ महिन्यांची एक मुलगी, कृष्णा झोरे, एक मुलगा व दोन महिला असे पाचजण होते. घरावरील हल्ल्यामुळे झोरे कुटुंबीय हादरले. त्यांनी घराच्या आतील बाजूने असलेल्या पत्र्याच्या छताखाली आसरा घेतला. त्यामुळेच तुटलेल्या कौलांमुळे त्यांना धोका पोहोचला नाही.
एकिकडे झोरे कुटुंब भयग्रस्त झालेले असतानाच घराबाहेर चारही बाजूने जमावाने कब्जा केला होता. जमावातील काहींनी प्रक्षुब्ध होत झोरे यांच्या अंगणात असलेली एक
दुचाकी पेटवून दिली, तर दोन दुचाकींची तोडफोड केली. अंगणात असलेली खाट तोडली, कपडे, अंथरूण व अन्य साहित्याचे नुकसान केले.
झोरे यांच्या घराभोवती जमाव झाल्याचे व दगडफेक सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलीसपाटील चंद्रकांत निंबरे यांनी त्याबाबतची माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना कळवली. पावणेबारा वाजताच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार थांबला. यावेळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक एम. एस. थिटे व त्यांचे सहकारी उपस्थित
होते. घटनास्थळी पोलिसांनी
पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
त्याचवेळी पोलिसांकडे झोरे यांच्या दोन मुलांकडून ग्रामस्थांना कसा त्रास होत आहे, याची माहिती देण्यात आली. ९ जानेवारीला मारहाण होऊनही रांबाडे यांनी तक्रार दाखल केली नव्हती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी जगदीश झोरे व मंगेश झोरे यांच्याविरोधात भा.दं.वि. ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रात्रीच्या घटनेच्यावेळी घरात नसलेल्या या दोघांनाही पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेच्या कारवाईबाबत प्रक्रिया सुरू होती, तर अज्ञात जमावावर भा.दं.वि. १४३, १४७, १४८, ३३६, ४२७, ४३५, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)



छेडछाडीमुळेच वादंग
जगदीश झोरे व मंगेश झोरे या संशयित आरोपींनी गेल्यावर्षी गावातील मुलींची छेडछाड केली होती. त्यामुळे गेल्या शिमगोत्सवाला गावबैठकीत या दोघांनाही माफी मागायला लावण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून या झोरे बंधूंनी गावातील काही संबंधितांना धमकावण्याचे प्रकार सुरू केल्याची तक्रार होती. सातत्याने हे प्रकार सुरू झाल्यामुळेच प्रक्षुब्ध जमावाने झोरे यांच्या घरावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातही युपी, बिहार?
वेतोशीतील कृष्णा झोरे
यांच्या घरावर ज्याप्रकारे हल्ला झाला त्यामुळे अनेकांच्या अंगावर शहारे आले. महाराष्ट्रासारख्या आधुनिक विचारसरणीच्या, सुसंस्कृत राज्यातच आपण
राहत आहोत ना, अशी शंका येण्याजोगी स्थिती होती. त्यामुळे आपल्याकडेही युपी, बिहारची संस्कृती आली काय, अशी चर्चाही सुरू आहे.

Web Title: The attack on the house of the Vattoit-busted crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.