दारू विक्रेत्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:53 PM2017-09-11T22:53:04+5:302017-09-11T22:53:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगड : देवगड तालुक्यातील मालपे ग्रामस्थांनी गोवा बनावटीची दारू आणून ती विकणाºया कार चालकासह सोमवारी सकाळी ६ वाजता अडविली. याबाबत विचारणा करीत ग्रामस्थांंनी केलेल्या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून कारचालक विलास हुन्नरे याने तेथून पळ काढला. मात्र विजयदुर्ग पोलिसांनी त्याला कणकवली येथून
ताब्यात घेतले. गोवा बनावटीच्या दारूचे
बॉक्स घेणाºया शंकर समजीसकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर कार व ४0 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
कणकवली येथील विलास रामचंद्र हुन्नरे (वय ६४) हा त्याच्या मालकीच्या कारने सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स घेऊन मालपे येथे जात होता. सकाळी ६ वाजण्याचा सुमारास मालपे-गावठणवाडी येथे तेथीलच शंकर लक्ष्मण समजीसकर (५0) व त्याची पत्नी स्वाती शंकर समजीसकर (४५) हे दोघे त्याच्या गाडीतील दारूचे बॉक्स खाली उतरून घेत असताना लोकांनी पाहिले. त्यांनी याबाबत चालक विलास हुन्नरे याला विचारणा केली. यावरून ग्रामस्थांशी त्याची बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी आक्रमक होत गाडीच्या काचाही फोडल्या. यामुळे चालक हुन्नरे हा घाबरून तेथून पळाला. त्यानंतर ग्रामस्थांनी मालपे पोलीस पाटील विलास गोपाळ सुतार यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
पोलीस पाटील सुतार यांनी विजयदुर्ग पोलीस स्टेशनला याबाबत कळविल्यानंतर पोलीस नाईक आगा, गुणीजन, महिला कॉन्स्टेबल मिठबांवकर, चालक कदम यांनी घटनास्थळी जाऊन कार ताब्यात घेतली. गाडीमधील गोवा बनावटीची ४0 हजार रूपये किमतीची दारू ताब्यात घेण्यात आली. विजयदुर्ग पोलिसांनी कार व दारुसहीत सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील पळून गेलेला संशयित विलास हुन्नरे याला विजयदुर्ग पोलिसांनी कणकवली येथून तर शंकर समजीसकर व त्याच्या पत्नीला मालपे तिठा येथून ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणे, दारू ताब्यात बाळगणे व विक्री करणे याप्रकरणी विलास हुन्नरे, शंकर समजीसकर व स्वाती समजीसकर या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.
कारच्या काचा फोडल्या
जोपर्यंत दारू व्यावसायिकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत गाडी तसेच दारुसाठा पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा पवित्रा मालपे ग्रामस्थांनी घेतला होता. मालपे-गावठणवाडी येथे गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स गाडीतून उतरवित असताना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारच्या काचाही फोडल्या.
महिलांचा रूद्रावतार
या मोहिमेत महिलांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात आढळून आला. यावेळी वाहनचालक आणि मालपे ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या महिलांनी आक्रमक होत जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत आणि संबंधितांवर कारवाई करीत नाहीत तोपर्यंत दारूसाठा पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे वाहनचालकाने चप्पल आणि चष्मा गाडीत ठेवूनच कणकवलीच्या दिशेने पलायन केले.