'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:35 AM2019-07-11T11:35:42+5:302019-07-11T11:38:24+5:30

कलम 353 मध्ये बदलाची मागणी करणार, नितेश राणेंची भूमिका.

'Attacking anyone does not fit our culture and culture' Nitesh rane after got bail | 'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही'

'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही'

Next
ठळक मुद्देकलम 353 मध्ये बदलाची मागणी करणार, नितेश राणेंची भूमिका.आमचं आंदोलन लोकांचं, लोकांसाठी केलेलं आंदोलन होतं. जनतेच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोतआपल्या आंदोलनासंदर्भात त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.

सिंदुदुर्ग - चिखलफेक आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या आमदार नितेश राणेंना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर, सुटका होऊन बाहेर येताच, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या आंदोलनासंदर्भात त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. माझं आंदोलन हे जनतेचं आंदोलन होतं. जनतेसाठी आंदोलन होतं. त्यामुळेच, अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि लोकांनी आम्हाला पाठींबा दिला. त्यामुळे आम्हाला आतमध्ये ऊर्जा मिळाली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे नितेश राणेंनी म्हटले.    

आमचं आंदोलन लोकांचं, लोकांसाठी केलेलं आंदोलन होतं. जनतेच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जेव्हा मी आमदार म्हणून निवडून गेलो, तेव्हा मी एक शपथ घेतली होती. मी माझ्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करील, असे मी त्यावेळी म्हटलं होतं. कोणालाही मारणं, कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती आणि संस्कारात बसत नाही. आजही मला वाटतं, महाराष्ट्रातील सर्व अधिकारी वर्गाला मी सांगू इच्छितो की, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंत. तुम्ही जनतेची सेवा केलीत, ज्यासाठी तुम्हाला ही खुर्ची आणि पद दिलं आहे. तर अशा पद्धतीची आंदोलन कुठेही होणार नाहीत. जेव्हा बैठका, आंदोलनं, निवेदन हे पर्याय जेव्हा संपतात तेव्हाच अशा पद्धतीची आंदोलन होतात, असे म्हणत नितेश राणेंनी त्यांच्या कृतीचं एकप्रकारे समर्थन केलं आहे. जिल्हा न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आमदार नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 

सरकारी अधिकारी वर्गाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं, तर अशी आंदोलन होणार नाहीत. कायद्यातील कलम 353 हे कवच म्हणून वापरा, शस्त्र म्हणून नको, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत होतो. पुढच्या टर्ममध्ये संधी मिळाली तर कलम 353 मध्ये बदल करण्याची मागणी मी करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या आंदोनलादरम्यान, जुन्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना आम्हाला पाठींबा दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असेही राणेंनी म्हटलं. 
दरम्यान, उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. जामीन मंजूर करतानाही न्यायालयानं काही अटी-शर्थी ठेवल्या आहे. या प्रकरणात नितेश राणेंना पोलिसांना सहकार्य करावं लागणार असून, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा होणार नसल्याचीही ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दर रविवारी नितेश राणेंना हजेरी लावावी लागणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.  



 

 

Web Title: 'Attacking anyone does not fit our culture and culture' Nitesh rane after got bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.