Sindhudurg: श्री देव कुणकेश्वर चरणी देवगड हापूसची आकर्षक आरास

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 11, 2024 06:13 PM2024-05-11T18:13:28+5:302024-05-11T18:32:30+5:30

सलग दहाव्या वर्षीही हापूस आंब्यांच्या आरासची जपली जातेय परंपरा

Attractive Aaras of Devgad Hapus on the feet of Shri Dev Kunkeshwar | Sindhudurg: श्री देव कुणकेश्वर चरणी देवगड हापूसची आकर्षक आरास

Sindhudurg: श्री देव कुणकेश्वर चरणी देवगड हापूसची आकर्षक आरास

दिनेश साटम

शिरगाव : देवगड म्हटले की, चटकन नजरेसमोर येतो तो देवगड हापूस आणि त्याची जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, अशा देवगड हापूसची ख्याती जगभरात आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात ११ मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा गेली १० वर्षे जपली जात आहे. याचे कारणच तसेच आहे.

कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार व देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून श्री देव कुणकेश्वर मंदिरात आंब्यांची आरास करण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पनेला यावर्षी दहा वर्षे झाली आहेत. दरवर्षी ११ मे या दिवशी देवगड हापूसची आरास न चुकता केली जाते. देवगड तालुक्यातील व कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात, यातूनच ही आरास केली जाते.

वातावरणातील सातत्याने होणारे बदल त्यातच आंबा पिकावर आलेले थ्रिपचे संकट अशातूनही मार्ग काढत आंबा बागायतदारांनी आंबा पिकाचे उत्पादन चांगले घेत यावर्षी पीक टिकवण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला हापूस आंब्याची आरास कमी प्रमाणात करण्यात येत होती. मात्र, जसजशी त्याची महती वाढत गेली त्यानुसार हापूस आंबा पेटी देणाऱ्या बागायतदारांची वर्षागणिक संख्यादेखील वाढत गेली आहे. त्यामुळे भव्य दिव्य पद्धतीने दरवर्षी ११ मे या दिवशी देवगड हापूस आंब्यांची आरास श्री देव कुणकेश्वर मंदिरात केली जात आहे.

मंदिरातील गाभारा, सभामंडप, तसेच बाहेरील सभामंडप या ठिकाणी ही आरास करण्यात आली आहे. हापूसच्या आरासामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर हापूसच्या सुगंधाने दरवळून गेला आहे. अनेक भक्तगण कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूस आंब्यांची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात.

कलेचा नमुना सादर

आरासमधील हापूस आंबे प्रसाद म्हणून आलेल्या भाविकांना दुसऱ्या दिवशी वितरित केला जातो. कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार देवगड हापूसच्या पेट्या आराससाठी देत आहेत आणि त्यातीलच काही भक्तजन मंडळी आपल्या कलेचा नमुना सादर करत अप्रतिम अशी कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांची आरास सजावट करत आहेत.

Web Title: Attractive Aaras of Devgad Hapus on the feet of Shri Dev Kunkeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.