पती-पत्नींच्या सहजीवनावर आधारीत दृकश्राव्य
By admin | Published: December 23, 2014 12:37 AM2014-12-23T00:37:49+5:302014-12-23T00:37:49+5:30
यश वेलणकर : जांभेकर व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाचा महामंत्र
देवगड : देवगड येथे उमाबाई बर्वे ग्रंथसंग्रहालय, राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पामध्ये ‘तुमच्या आमच्या घरात’ या पतीपत्नींच्या सहजीवनावर आधारीत जीवनातील कंगोरे उलगडणारा व त्यावर हलक्याफुलक्या स्वरूपाच्या तोडग्यांमुळे हे जीवन सुसज्ज कसे होईल हे दर्शविणारा दृकश्राव्य कार्यक्रम डॉ. यश वेलणकर यांनी रसिकांसमोर रविवारी सायंकाळी सादर केला.
स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक सहजीवनामध्ये दोघांनीही एकमेकांची मानसिक व जैवशास्त्रीय जडणघडण लक्षात घेणे किती गरजेचे आहे या एका नवीनच पैलूला या संपूर्ण व्याख्यानामध्ये डॉ. यश वेलणकर यांनी स्पर्श केला. त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीचे नायक-नायिका व खऱ्या जीवनातही पती-पत्नी असलेल्या अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी अभिनीत केलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांच्या चित्रफितीमधून याबाबत समस्यांचे विवेचन केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, स्त्री-पुरुषांच्या जीवशास्त्रीय संरचनेतच मूलत: फरक असतो. स्त्रीकडे रंगभेदाचे बारीक निरीक्षण करण्यासाठी ठराविक हार्मोन्स असतात. तर त्यांची ५० टक्केहून जास्त कमतरता पुरुषात असते. पुरुष एकाचवेळी अनेक कामे करण्यासाठी सक्षम नसतो, तर स्त्रीकडे ही विशेष शक्ती असते. स्त्री स्थैर्यासाठी उत्सुक असते तर पुरुष सतत नाविन्यपूर्ण गोष्टींच्या मागे असतो.
पुरुष एका ठराविक दृष्टीकोनातून कोणत्याही समस्येकडे बघतो तर स्त्री सर्वंकष दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहते. स्त्रियांना भावनिक आधाराची गरज समस्या निवारण्यापेक्षा महत्वाची वाटते. तर पुरुष समस्या निवारणापुढे भावनेला कमी महत्व देतो. स्त्रियांना प्रत्येक व्यक्तीची देहबोली समजून घेण्याची कायम आवश्यकता वाटते तर पुरुष सरळसोट मार्ग पत्करतो. त्यामुळे स्त्रियांकडे ज्ञानेंद्रियांची शक्ती अपार असते. तर पुरुष स्नायूशक्ती (मसल पॉवर)चा वापर करताना दिसतो. या सर्व गोष्टींमध्ये हार्मोनल बॅलन्स सांभाळावा लागतो. पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन जास्त असतो. स्त्रीला नातेवाईकांची माहिती जास्त लक्षात राहते. कारण तिचे लक्ष चेहऱ्यांवर केंद्रीत असते. स्त्रीला नाते जोडणे, एकमेकांची आवडनिवड लक्षात ठेवणे, संपर्कातील व्यक्तींचे वाढदिवस, अन्य घटना लक्षात ठेवणे आवडते तर पुरुषांना कामापुरतेच या बाबींवर लक्ष ठेवणे आवडते. स्त्रीला स्पर्श भावना तीव्र असतात, त्यामुळे प्रत्येक कठीण प्रसंगात किंवा उत्कट प्रसंगात स्त्रीला स्पर्श सुखाची आवश्यकता भासते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वैवाहिक जीवनात सर्व प्रसंगांना सामोरे गेल्यास अनेक संघर्षपूर्ण प्रसंगातून कशी सहज सोडवणूक होऊ शकते यावर दृकश्राव्य माध्यमाद्वारे डॉ. यश वेलणकर यांनी उपस्थितांना हलक्या फुलक्या तंत्राने मार्गदर्शन केले. या व्याख्यानानेच या व्याख्यानमालेची सांगता झाली. (प्रतिनिधी)