ऑगस्ट महिना ठरला साथीचा महिना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्याचे थैमान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 2, 2023 12:35 PM2023-09-02T12:35:01+5:302023-09-02T12:36:03+5:30
एका महिन्यात आढळले ३१४ डेंग्यू बाधित रुग्ण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या साथीने थैमान घातले आहे. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे रुग्ण सापडले असल्याने ऑगस्ट महिना साथींचा महिना ठरला आहे. एका ऑगस्ट महिन्यात तब्बल ३१४ डेंग्यूचे, १९ मलेरियाचे आणि ३० चिकनगुण्याचे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जस जसा पावसाचा जोर कमी झाला तसा अन्य साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. जिल्ह्यातील विविध भागात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्यासारखे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यू बाधित आढळले आहेत. त्यापाठोपाठ चिकनगुण्या आणि मलेरिया रुग्णांचा समावेश आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या भागात आरोग्य यंत्रणा सतर्क असून संशयित रुग्णाचे रक्त नमुने घेण्यात येत आहेत. शिवाय त्या भागात स्वच्छता मोहीमही राबविली जात आहेत. जिल्ह्यात सापडलेले सर्व रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
ऑगस्ट मध्ये आढळले तब्बल ३१४ डेंग्यू बाधित रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जानेवारी ते आतापर्यंत ३४५ डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहे. यातील तब्बल ३१४ रुग्ण हे केवळ एका ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. तर आतापर्यंत १८८१ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील १४२८ नमुने हे एका ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेले आहेत.
गेल्या महिन्यात ३० रुग्ण चिकनगुण्याचे
जिल्ह्यात आतापर्यंत ४५ चिकनगुण्याचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १५ रुग्ण हे जानेवारी ते जुलै महिन्यातील आहेत. तर तब्बल ३० रुग्ण हे एका ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत.
मलेरिया रुग्णातही वाढ
डेंग्यू, चिकनगुण्या पाठोपाठ मलेरिया च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २९ मलेरियाचे रुग्ण आढळले असून यात ऑगस्ट महिन्यातील १९ रुग्णांचा समावेश आहे.