‘वेंगुर्ला ९’ लागवडीसाठी उपलब्ध
By Admin | Published: November 5, 2015 09:55 PM2015-11-05T21:55:12+5:302015-11-05T23:55:59+5:30
नवीन जात : काजू सुधार प्रकल्प योजनेची वार्षिक कार्यशाळा
वेंगुर्ले : काजू सुधार प्रकल्प योजनेच्या वार्षिक कार्यशाळेत देशभरातील ६0 काजू पिकावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन एकूण ३२ काजूपीक सुधारणा विषयक निर्णय घेतले. संकर ३0३ ही नवीन जात ‘वेंगुर्ला ९’ या नावाने राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी वितरित करण्यात आली.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अखिल भारतीय समन्वित काजू सुधार प्रकल्प योजनेची वार्षिक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ‘वेंगुर्ला ९’ ही नवीन काजूची जात लागवडीसाठी वितरित केली. या जातीच्या झाडाचा विस्तार अतिशय आटोपशीर असून, झाडाला घोसाने फलधारणा होणे हे याचे वैशिष्ट्य आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न प्रती झाड १५.९८ किलोग्रॅम एवढे असून, एका किलोमध्ये ११२ काजू बिया मावतात. तसेच गराचे प्रमाण अधिक असून काजू बीचे सरासरी वजन ८.९ ग्रॅम एवढे आहे. ही जात टी मॉस्किटो या किडीला ‘वेंगुर्ला ४’ या जातीच्या तुलनेत कमी प्रमाणात बळी पडते. ही जात बदलत्या हवामानात सुद्धा काजूचे चांगले उत्पन्न देते. या जातीची कलमे पुढील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे शेतकऱ्यांकरिता उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काजू बागायतदार, कृषी विभागातील अधिकारी व कार्यशाळेला उपस्थित असणारे शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या काजूपीक विषयक समस्यांना उपस्थित शास्त्रज्ञांनी समर्पक माहिती देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. या कार्यक्रमाचा समारोप संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. टी. जानकीराम, काजू प्रकल्प समन्वयक डॉ. पी. एल. सरोज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विविध सत्रामध्ये घेतलेल्या निर्णयाचे वाचन होऊन त्यावर चर्चा करण्यत आली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)