‘अवकाळी’ने आंबोलीला झोडपले
By admin | Published: March 6, 2016 12:59 AM2016-03-06T00:59:27+5:302016-03-06T00:59:27+5:30
ग्रामस्थांची त्रेधातिरपीट : छपरे उडाली, वीज खांब कोसळला
आंबोली : शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आंबोली परिसराला चांगले झोडपल्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. ठिकठिकाणी घरांवरील छप्पर कोसळून हजारोंची हानी झाली, तर वीज खांब रस्त्यावरच कोसळून वाहतुकीची कोंडी झाली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला होता. कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त होत होती. शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजता आंबोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर तो सुरू होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने क्षणार्धात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली, तर बहुतांशी दुकाने बंद करण्यात आली. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब रस्त्यावर कोसळला. रस्त्याच्या मध्यभागीच हा खांब पडल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांत भीती पसरली. यावेळी काही ग्रामस्थांनी समयसूचकतेने दोन्ही बाजूंनी वाहने अडवली. वीज कार्यालयात दूरध्वनीवरून माहिती देऊन वीज बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे सुदैवाने हानी झाली नाही.
नांगरवाक येथे गणपत पाटील यांच्या घरावरील छपराचे सर्व पत्रे उडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सविता धमकर, भागोजी येडगे, विठ्ठल येडगे, चौडू पाटील, पांडुरंग काकोरे यांच्याही घराच्या छपरावरील पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. पत्रे उडून गेल्याने या सर्व घरात पाणी साचून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच जकातवाडी येथील परुळेकर यांच्यासह तिघाजणांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने तेथेही मोठे नुकसान झाले. चितळशेत येथेही रामा पडते यांचे छप्पर उडून नुकसान झाले. (वार्ताहर)
अनर्थ टळला, पण ‘महावितरण’बाबत संताप
चार महिन्यांपूर्वी येथील विजेचे खांब बदलण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. यासाठी महावितरणला निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे वाहतुकीच्या रस्त्यावरच वीज खांब पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यामुळे अनर्थ टळला असला तरी धोका मात्र कायम असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर रोष व्यक्त केला. जीर्ण झालेले विजेचे खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे.