कामांसाठी पैसे देणे टाळा, तक्रार करा
By admin | Published: December 9, 2014 08:22 PM2014-12-09T20:22:07+5:302014-12-09T23:21:50+5:30
लाचविरोधात आवाहन : नागरिकांच्या सतर्कतेमुळे वर्षभरात अकराजणांवर कारवाई, आज भ्रष्टाचारविरोधी दिन
रजनीकांत कदम -कुडाळ -लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असूनही आपले काम होण्यासाठी कोणीतरी शासकीय अधिकाऱ्यांना पैशाच्या स्वरुपात लाच दिली जाते. सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यातही लाच देण्याचे काही प्रकार काही घटनांमधून समोर आलेत. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळेच लाचलुचपत कार्यालयाकडून अकराजणांवर कारवाया झाल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एकूण अकराजणांना सिंधुदुर्गातील लाललुचपत विभागाने रंगेहात पकडले. जिल्ह्यातील अशा घटना थांबविण्याकरिता कोणी लाच घेत असेल किंवा लाच देत असेल, तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावरून या विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लाच देण्यासंदर्भात या विभागाकडे कोणीही तक्रार करीत नाही. कारण त्यांना आपले काम होणे गरजेचे असते. कशाला या पोलिसांच्या आणि कोर्टकचेऱ्यांच्या भानगडीत पडायचे, अशा मानसिकतेमुळे लाच देणाऱ्यांच्या व घेणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होते. एखादे सरळमार्गी होणारे कामसुध्दा अधिकारी व इतर लोकांना चिरीमिरी देऊन करावे लागते.
जिल्ह्याची स्थिती पाहता येथील जनता साधीभोळी आहे. कायद्याला घाबरून हातात घेणारी नाही. शक्यतो चांगल्या, सरळ मार्गाने आपले काम करणारी जनता आहे. सतर्कता असलेले व चांगले नागरिक असलेले या जनतेचे एक उदाहरण म्हणजे, या जिल्ह्यातील जनतेने वर्षभराच्या कालावधीत लाच घेणाऱ्या व देणाऱ्या अकराजणांना रंगेहात पकडून दिले आहे. रंगेहात पकडलेल्यांमध्ये रोहन दणाणे हा शिकावू पोलीस उपनिरीक्षक आहे, तर मनीषा शिपुगडे हिला तलाठी पदावर नोकरी लागून वर्षही पूर्ण झाले नव्हते. तर बाकीच्या बहुतेक जणांची नोकरीतील अजून बरीच वर्षे सेवा बाकी आहे. या सर्व जणांंना चुकीच्या कामाची फळे मिळालीच. लाचलुचपत विभाग, सिंधुदुर्गच्या विभागीय अधीक्षकपदी सेवा बजावलेले विभागीय पोलीस उपअधीक्षक विठ्ठल जाधव यांची निवृत्ती काळ अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना त्यांना वीस लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे आपल्या कामातून आदर्शवाद निर्माण करणाऱ्या व जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेलाच अधिकारी लाच घेताना पकडला गेला होता. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली होती.
यावर्षीच्या काही कारवाया
१ मार्च : स्मिता प्रकाश भालेकर (वय ३२), पद : कनिष्ठ बांधकाम अभियंता नगर परिषद, वेंगुर्ले, गुन्हा : नाहरकत दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक
४ मार्च : विठ्ठल अण्णा जाधव (वय ५७), पद : विभागीय पोलीस उपअधीक्षक, सावंतवाडी, गुन्हा : दाखल असलेली एक केस मागे घेण्यासाठी २० लाखाची लाच घेताना सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये रंगेहात अटक.
४ एप्रिल : चित्रा तुकाराम धुरी, पद : लिपीक, तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ले., गुन्हा : एका प्रकरणातील जबाबाच्या नकली प्रती मिळण्याकरिता दोनशे रुपयांची लाच घेताना अटक.
८ जून : सुधाकर मानाजी परब, पद : सरपंच, सागवे-ता. कणकवली), गुन्हा : एका दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक होऊ नये, तसेच अटक झाल्यास सवलत मिळावी, याकरिता पोलिसांना दोन लाखाची लाच देत होता. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांबी यांनी तक्रार दिली होती.
१२ जून : रोहनकुमार दणाणे, पद : शिकावू पोेलीस उपनिरीक्षक, दोडामार्ग, गुन्हा : गाडी सोडण्याकरिता १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक.
२ जुलै : विलास बाबाजी तेली, पद : जिल्हा उद्योग कें द्र निरीक्षक, गुन्हा : नवीन घालण्यात येणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योगाबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी आठशे रुपयांची लाच घेताना अटक.
१६ सप्टेंबर : मनीषा बळवंत शिपुगडे (वय २४), पद : बिबवणे तलाठी (ता. कुडाळ), गुन्हा : सातबारा दाखला देण्यासंदर्भात चारशे रुपयांची लाच घेताना अटक.
६ आॅक्टोबर : कृष्णाबाई रामदास सामंत (वय ३५), पद : साळगाव तलाठी (ता. कुडाळ), सात/बारा उताऱ्यावर नाव चढविण्याकरिता ४० हजार रुपयांची लाच घेताना राहत्या घरी रंगेहात पकडले.
३ डिसेंबर : तुषार उदय कदम (वय १९), पद : सर्व्हेअर, भूमी अभिलेख, सावंतवाडी व अतिरिक्त छाननी लिपिक, गुन्हा : जमीन मोजणीकरिता बाजूचे कब्जेदार यांना नोटीस देण्याकरिता पाचशे रूपयांची लाच घेताना अटक.
४ डिसेंबर : सत्यवान अर्जुन भगत (वय ३५), पद : दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिंधुदुर्ग, गुन्हा : ट्रान्सपोर्टच्या गाड्या सोडण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना बाळकृष्ण कुडव याच्यासह बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गावर अटक. या सर्व लाच देणाऱ्या व घेणाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली.
विभागाचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता जनजागृती सप्ताह राज्यभर राबविण्यावर भर दिला. त्यामुळे आम्ही जनजागृती सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचलो. त्यामुळे जनता आता सहज तक्रार देतात. त्यामुळेच आम्ही कारवाई करू शकलो. लाच घेणाऱ्याबाबत कायद्यात शिक्षेच्या मोठ्या तरतुदी आहेत. आपणच या गोष्टींना खतपाणी घालतो व या प्रवृत्ती वाढतात. या प्रवृत्तींंला वेळीच आळा घातला पाहिजे. लाच घेणाऱ्यापेक्षा लाच देणाराही तितकाच गुन्हेगार असतो, हे विसरून चालणार नाही.
- जगदीश सातव
उठा, जागे व्हा, तक्रार करा
आपण या देशाचे नागरिक असून लाच देणे किंवा घेणे हा गुन्हा आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात जनतेने पेटून उठले पाहिजे. जर कोणी लाच घेत असेल किं वा देत असेल, तर याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क केला पाहिजे. यासाठी तक्रारदाराला कोणतीही चिंता करण्याची किं वा घाबरण्याची गरज नाही. कारण तक्रार करावयाची असल्यास तक्रारदारास सर्व प्रकारचे सहकार्य मिळते. तक्रारदारास लाचलुचपत विभागाच्या कार्यालयापर्यंत येणे शक्य नसल्यास या विभागाचे अधिकारी त्याच्यापर्यंत पोहोचतात. लाचखोराला पकडून दिल्यास आपले पुढील काम होणार नाही, अशी चिंता बाळगू नये. लाखो रुपयांचीच लाच घेताना पकडतात असे नाही, तर शंभर रुपयांचीही लाच घेताना पकडले जाते. कितीही रुपयांची लाच घेताना अटक झालेल्यांना शिक्षाही एकाच प्रकारची होते. १०६४ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. त्यामुळे २४ तास सेवा उपलब्ध असते.