शिकाऱ्यांवरील कारवाईला टाळाटाळ
By admin | Published: June 20, 2014 12:12 AM2014-06-20T00:12:38+5:302014-06-20T00:12:38+5:30
दोडामार्ग तालुक्यातील स्थिती : वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले; संबंधितांचे दुर्लक्ष
शिरीष नाईक कसई दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गवारेडा व सांबराच्या शिकारींच्या काही घटना उघडकीस आल्या. मात्र, वनविभाग याकडे दुर्लक्षच करीत आहे. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या स्थानिकांवर तत्काळ कारवाई होते. मात्र, परप्रांतीयांवर कारवाई न करता केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जातात. या प्रकारामुळे तालुकावासीयांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात जंगलपट्टा मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द असा हा तालुका आहे. या नैसर्गिक डोंगराकडे केरळीयन परप्रांतीयांच्या नजरा गेल्या. इथे काही मिळणार, या हेतूने या भागातील डोंगर विकत घेतले गेले. काही जागा करारावर घेतल्या गेल्या. तिलारी बुडीत क्षेत्रातही परप्रांतीयांनी जागा विकत घेतल्या. उत्पादनाच्या दृष्टीकोनातून जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड होऊ लागली आणि आजही सुरू आहे. डोंगर बोडके झाले. मात्र, वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले. नाममात्र दंड आकारून संबंधिताना सोडून देण्यात आले. त्यानंतर जंगलातील वन्य प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. जंगलतोड झाल्याने वन्य प्राणी वस्तीमध्ये येऊ लागले. जंगली हत्ती, गवा रेडा, सांबर, डुक्कर, वाघ हे प्राणी २० वर्षांपूर्वी जंगल भागाशिवाय नजरेसही पडत नव्हते. परंतु, आता मात्र मानवीवस्तीत त्यांचे वरचेवर दर्शन होत आहे. परप्रांतीयांनी डोंगर सपाट करून याठिकाणी रबर, अननस, केळी यांच्या बागा फुलविल्या. त्यामुळे येथे जंगली प्राणी येऊ लागले. त्यांचा त्रास टाळण्यासाठी केरळीयन लोकांकडून प्राण्यांची शिकार होऊ लागली. जंगली गवारेड्यांचे मांस केरळीयन खातात. त्यामुळे गव्यांचीही शिकार वाढू लागली. प्राण्यांची संख्या जास्त असल्याने केरळीयनांनी मांसाची तस्करी सुरू केली. यामध्ये जास्त फायदा होऊ लागल्याने गव्यांच्या शिकारीत वाढ झाली. तिराळी बुडीत क्षेत्रात भिकेकोनाळ, शिरवल या भागात गव्यांची शिकार करण्यात आली. याबाबतचे पुरावेही मिळून संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गोष्टीला दोन वर्षे उलटूनही अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. रबर प्लांटेशनच्या नावाखाली या भागात गांजाची लागवड केली जात आहे. गांजा लागवड करणाऱ्यांना रंगेहात पकडूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आजही तालुक्यात गांजा लागवड होत आहे. गांजा विकतानाही काहीजणांना पकडण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. गांजा शोधण्यासाठी जंगलाची पाहणी करणे आवश्यक होते. परंतु तसे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गांजा लागवडीमध्ये केरळीयनांचा हात आहे, हे वारंवार स्पष्ट झाले. तसेच अननसाच्या लागवडीखाली साप पकडून त्यांच्या विषाची तस्करी होत असल्याचे ग्रामस्थांनी पुराव्यासह वनविभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. या भागात केरळीयनांकडून मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांची शिकार होत असताना वनविभाग मात्र हाताची घडी घालून आहे. अशा घटना घडल्यानंतर कारवाई करण्याची आश्वासने दिली जातात. परंतु पुराव्याअभावी हे खटले निकाली काढले जातात. वनविभागाने तिलारी बुडीत क्षेत्रामध्ये केंद्रे येथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयितांचे फुटेज सापडले मिळाले होते. त्याद्वारे स्थानिकांवर कारवाई करण्यात आली. परंतु परप्रांतीयांवर मात्र दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे स्थानिकांना एक न्याय आणि परप्रातियांना वेगळा न्याय, या वनविभागाच्या दुटप्पी धोरणामुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त होणे साहजीकच आहे.