कोकणातील नागरिक जागृत : शेखर सिंह
By Admin | Published: September 22, 2015 09:12 PM2015-09-22T21:12:23+5:302015-09-22T23:53:34+5:30
देवगड येथे आनंदोत्सव : हागणदारीमुक्त तालुका म्हणून घोषित
देवगड : विदर्भ, मराठवाडा यापेक्षा कोकणातील बांधव हा जागृत आहे. एखादी गोष्ट समजून घेऊन ती पूर्ण क्षमतेने पूर्ण केल्याने तालुका हागणदारीमुक्त करण्यात त्याने बाजी मारली. ही बाब गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी देवगड येथे बोलताना केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत देवगड तालुका पंचायत समितीमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमात देवगड तालुका हागणदारीमुक्त तालुका म्हणून घोषित करण्याकरीता खास आनंदोत्सवाचे आयोजन येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी शेखर जाधव, पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, प्रणाली माने, हर्षा ठाकूर, संजीवनी बांबुळकर, मनस्वी घारे उपस्थित होते.या आनंदोत्सवापूर्वी खास जनजागृती रॅली देवगड पंचायत समिती ते बाजारपेठमार्गे इंद्रप्रस्थ हॉलपर्यंत काढण्यात आली. यात कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, पंचायत समिती या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या आनंदसोहळ्याच्या निमित्ताने मराठमोळी संस्कृती - एक कलाविष्कार हा कार्यक्रम नारिंग्रे येथील पोवईमाता महिला मंडळाने सादर करून वाहवा मिळविली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी करून निर्मलग्राम व हागणदारीमुक्त ग्राम यात फरक असल्याचे स्पष्ट करीत असताना ७४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या हे घोषित करण्याकरीता हा आनंदसोहळा आयोजित केला असून या तालुक्यातील २६ हजार कुटुुंबे शौचालयाचा वापर करतात ही बाब आनंदाची आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत म्हणाले की, देवगड तालुका प्रत्येक अभियानात प्रथम क्रमांकाचे यश संपादित करीत असताना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्याने हागणदारीमुक्त तालुका म्हणून घोषित करण्याचा मान पटकावला ही बाब कौतुकास्पद असून या यशाकरीता या तालुक्यातील २६ हजार कुटुंबांचे आपण अभिनंदन करतो. चांगल्या कार्याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदैव पाठीशी उभी राहील असे अभिवचन दिले. यावेळी देवगड पंचायत समिती सभापती डॉ. मनोज सारंग, माजी सरपंच बाळासाहेब ढोके यांनी विचार मांडले. (प्रतिनिधी)
विशेष सन्मान
देवगड तालुका हागणदारीमुक्त करण्यास ज्या ज्या पंचायत समिती अधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पत्रकार अशा ६९ जणांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच संदेश सावंत, संजय बोंबडी यांचाही शाल व सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.