निळेली पशुधन संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:35 IST2020-12-28T19:34:24+5:302020-12-28T19:35:53+5:30
Agriculture Sector Dapoli Sindhudurg डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत वंश संरक्षण पुरस्कार २०२०ने सन्मानित करण्यात आले.

निळेली संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोककुमार चव्हाण व डॉ. समीर शिरसाट यांनी कोकण कनयाळ जातीच्या शेळ्यांची माहिती दिली.
माणगांव : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत वंश संरक्षण पुरस्कार २०२०ने सन्मानित करण्यात आले.
भारतीय वंशाच्या विविध पाळीव प्राण्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच संस्थांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. निळेली केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोककुमार चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम कोकण कनयाळ या नवीन संशोधित शेळी जातीची नोंदणी २०१० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून समान गुणधर्माच्या व उत्तम दर्जाच्या शेळ्या एकत्र करून त्यांचे निळेली येथील पशुधन संशोधन
केंद्रावर संवर्धन करण्याचे काम सुरू झाले.
कोकणातील विविध कृषी विज्ञान केंद्रांवर प्रात्यक्षिक संच तयार करण्यात आले. मागील पाच-सहा वर्षांत विद्यापीठाने २००० हून अधिक कोकण कनयाळ जातीच्या शेळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शेळी संशोधन प्रकल्पाशी निगडित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू कविटकर व डॉ. समीर शिरसाट यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
१४८ कोकण कनयाळ शेळ्यांचा कळप
सध्या निळेली संशोधन केंद्रावर १४८ कोकण कनयाळ शेळ्यांचा कळप आहे. हा पुरस्कार प्रस्ताव सादरीकरणासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. बाळकृष्ण देसाई तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. बळवंत सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल निळेली पशु संशोधन केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारीवर्गाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.