मालकी हक्काबाबत कुळांमध्ये जागृती
By admin | Published: March 4, 2015 09:38 PM2015-03-04T21:38:57+5:302015-03-04T23:44:27+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : १३,६६७ खातेदारांकडून नजराणा रक्कम जमा
रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी अगदी अल्पसा नजराणा रक्कम भरून या जमिनीची मालकी मिळवता येते. मात्र, याबाबत कुळांमध्ये जागृती होण्यासाठी प्रशासनानेच ‘तलाठी तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता हळुहळू कुळांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र असून, जिल्ह्यातील १,१४,४१० खातेदारांपैकी १३,६६८ कुळांनी नजराणा रक्कम भरली आहे. अजुनही १,००,८६७ खातेदारांकडून ही रक्कम भरणा व्हायची आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये कुळांना ते वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी परत मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कुळांची वहिवाट असली तरी त्यांना त्या जमिनी विकताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे.
त्यामुळे या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनींच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रीतसर नोंद करून घेणे गरजेचे आहे. नजराणाची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रूपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येऊनही ‘जेव्हा जमीन विकायची असेल तेव्हा बघू’, असे म्हणत कुळांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे.मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्थापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ४१० खातेदार आहेत. आत्तापर्यंत या विशेष कायद्यानुसार ४० पट नजराणा रक्कम भरून जिल्ह्यात १३,६६८ कुळानींच मालकी हक्क मिळवला आहे.
प्रशासनाकडून जागृतीचे प्रयत्न होत असूनही कुळांच्या उदासीनतेमुळे कुळहक्कांपासून अनेक कुळे वंचित रहात आहेत. तरीही अगदी ग्रामीण भागात असलेल्या कुळांमध्ये जागृती होऊन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पुन्हा आता एप्रिल महिन्यापासून विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कूळ वहिवाट शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र घोसाळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
पूर्वमंजुरी नको
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियत १९४८ च्या कलम ४३(१) अधिनियमातील नव्या सुधारणेनुसार आता १० वर्षे पूर्ण झालेल्या जमिनीची खरेदी विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, पट्टयाने देणे, अभिहस्तांतरण यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
सर्वाधिक खातेदारांची संख्या रत्नागिरी तालुक्यात ३३,२२९ इतकी आहे. त्याखालोखाल दापोलीत २०,८१३ खातेदार आहेत. त्यामानाने रत्नागिरीत नजराणा रक्कम भरलेल्यांची संख्या अधिक आहे. पण दापोलीत केवळ ४४० आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू.
जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रीतसर नोंद करून घेणे गरजेचे.
नजराणा भरलेल्या तसेच शिल्लक कुळांची सख्या
तालुकाएकूणनजराणा भरलेलेशिल्लक
मंडणगड०० ०
दापोली२०,८१३४४० २०,३७३
खेड४,३२०८२१ ४,०३७
चिपळूण१९,०१२७१० १८,३०२
गुहागर१८,०२२१२३० १६,७९२
संगमेश्वर६,२४२२०९४ ४,४४८
रत्नागिरी३३,२२९८१०० २५,१२९
लांजा१२,४७२६८६ ११,७८६
राजापूर०१२५ ०
एकूण१,१४,४१०१३,६६८ १,००,८६७