कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:02 PM2020-10-12T14:02:44+5:302020-10-12T14:07:13+5:30
coronavirus, sindhudurg राज्यात सध्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
सिंधुदुर्गनगरी : राज्यात सध्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
या मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध माध्यमांचा उपयोग होत आहे. यात कळसुत्री बाहुल्या व दशावतार या लोककलांच्या माध्यमातूनही या मोहिमेची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या संकल्पनेतून जनजागृतीसाठी कळसूत्री बाहुल्या व दशावतार या कलांचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनीही परिश्रम घेतले. पिंगुळीतील परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम तयार केला आहे.
या मोहिमेत नेमलेली आरोग्य पथके घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. त्यात थर्मल गनच्या सहाय्याने तापमान तपासणे, आॅक्सिमीटरने आॅक्सिजनची लेवल तपासणे यासह कोणाला मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा असे आजार आहेत का याची माहिती घेतली जात आहे.
या तपासणीत काही लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. त्यांची संपूर्ण तपासणी होते. तसेच कोरोनाचीही तपासणी करण्यात येते.