अप्रतिम ‘स्टॅच्यू’नी डोळ्यांचे पारणे फेडले.
By admin | Published: October 2, 2014 09:58 PM2014-10-02T21:58:27+5:302014-10-02T22:22:50+5:30
जिल्हास्तरीय स्पर्धा : बांदा येथील ‘ग्राम स्वच्छता अभियान’ प्रथम
वेंगुर्ले : एकापेक्षा एक अप्रतिम अशा ‘स्टॅच्यू’नी वेंगुर्लेतील रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येथील मातोश्री कला-क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्टॅच्यू स्पर्धेत स्पर्धकांनी विविध विषयावरील आकर्षक असे स्टॅच्यू सादर केले. बांदा येथील गुरू बांदेकर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या ‘ग्राम स्वच्छता अभियान’ या स्टॅच्यूने प्रथम क्रमांक मिळविला.
दाभोली नाका येथे झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक बांदा येथील भाई म्हाडगूत आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कारगिल विजय’ या स्टॅच्यूला आणि इन्सुली येथील विलास कोरगावकरने सादर केलेल्या ‘गार्डन लॅम्प’ या स्टॅच्यूला विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक बांदा येथील बाबू मेस्त्री आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कबड्डी ट्रॉफी’ या स्टॅच्यूला देण्यात आला.
उत्तेजनार्थ क्रमांक मकरंद वेंगुर्लेकर (महात्मा गांधी), धीरज घाडी (श्री देव वेतोबा आरवली), नित्यानंद वेंगुर्लेकर (धूम्रपान टाळा जीवन वाचवा), भैरवी घाडी (उपरलकर देवस्थान) व प्रतीक्षा आरोलकर (मारुती) यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. पी. जी. देसाई, महेंद्र मातोंडकर व पंकज शिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन छोटू कुबल यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मातोश्री कला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विष्णूदास कुबल, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, श्रीकांत रानडे, जयंत मोंडकर, वसंत तांडेल, प्रकाश धावडे, कांता मुणनकर, सुनील भैरे, सुनील मांजरेकर, दादा सोकटे, शरद मेस्त्री, भूषण आंगलेकर, छोटू कुबल, तुषार साळगावकर व अन्य सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विजेत्यांचे उत्सव समितीचे अध्यक्ष विलास गावडे व उपाध्यक्ष भूषण सारंग यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)