बाबा मोंडकर यांनी मोडली पक्षशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:19 PM2017-08-12T23:19:44+5:302017-08-12T23:19:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : मालवणच्या तालुकाध्यक्ष बदलावरून झालेल्या गैरसमजातून वाद निर्माण झाला. तालुका सरचिटणीस यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर बाबा मोंडकर यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी प्रमोद जठार यांच्यावर आरोप केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांविरोधात भाष्य करणाºया बाबा मोंडकर यांनी पक्षशिस्त मोडली असल्याने त्यांच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर चौकशी अहवाल देण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ त्यांच्यावरील शिस्तभंगाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती भाजप प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी तालुकाध्यक्ष बदलावरून जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याविरोधात भाष्य केल्याने भाजपची जिल्हास्तरीय चौकशी समिती मालवणात आली होती. या समितीने बाबा मोंडकर तसेच पदाधिकाºयांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुडाळकर यांनी मालवण तालुकाध्यक्ष पदावरून उठलेले वादळ शमले आहे. नवे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या नेतृत्वाखाली एकसंध व एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी भाजपचे बबलू राऊळ, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, भाऊ सामंत, बबलू राऊत, महेश मांजरेकर, धोंडी चिंदरकर, पूजा सरकारे, विकी तोरसकर, राहुल कुलकर्णी, उल्हास तांडेल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळकर म्हणाले, बाबा मोंडकर यांना तालुकाध्यक्ष बदलाबाबतची कल्पना देण्यात आली होती. जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग व मालवण या ठिकाणच्या तालुकाध्यक्ष बदलाबाबत कोअर कमिटीत निर्णय झाला होता. तालुकाध्यक्ष बदलाबाबत पक्षात लोकशाही व कार्यकर्त्यांचे मूल्यांकन असे दोन निकष आहेत. त्यामुळे कोअर समितीच्या मूल्यांकनानुसार मोंडकर यांच्या जागी केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार नाही. तालुका दौरा झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष जठार यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.
पक्षशिस्त मोडल्याचा ठपका
बाबा मोंडकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गंभीर आरोप केले. मोंडकर यांचे हे आरोप स्वार्थासाठी व मच्छिमार समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षांवर केलेले आरोप पक्षशिस्त मोडणारे असल्याने त्यांनी पक्षशिस्त मोडल्याचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे जयदेव कदम यांनी सांगितले, तर पुढील कारवाईबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, असे राजू राऊळ यांनी सांगितले.