राज ठाकरेंच्या समोर कार्यकर्त्यांत बाचाबाची
By admin | Published: June 28, 2015 11:10 PM2015-06-28T23:10:03+5:302015-06-29T00:24:33+5:30
सावंतवाडीतील घटना : जुन्या कार्यकर्त्यांनी भेट घेतल्याने दुसरा गट आक्रमक
सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यावेळी जुन्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतल्याने दुसरा गट चांगलाच आक्रमक झाला आणि त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली. यावेळी स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हॉटेलच्या रूममधून बाहेर येत जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे संताप व्यक्त केला. या अचानक घडलेल्या प्रकाराने सर्व कायकर्ते शांत झाले. हा सर्व प्रकार सावंतवाडीतील एका हॉटेलात घडला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारपासून सावंतवाडीत आहेत. त्यांनी रविवारी दुपारी मनसेच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जुन्या-नव्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाध्यक्ष धीरज परब व शैलेश भोगले या दोघांना हॉटेलमधील रूममध्ये बोलावून विचारविनिमय करीत असतानाच जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यात व जुन्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. बाचाबाचीचा आवाज हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चा करीत असलेल्या ठिकाणी ऐकण्यास गेला. त्यामुळे राज ठाकरे रूमच्या बाहेर आले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना चांगलेच सुनावले. तसेच चांगले वातावरण बिघडवू नका, अशी समजही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली व तेथे पुन्हा रूममध्ये गेले. या प्रकारानंतर मात्र मनसेतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. मनसेच्या जुन्या गटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुुंबई येथे भेटण्यास बोलावले असून त्यावेळी ते कैफियत ऐकून घेणार आहेत. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचा समावेश असून
त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अध्यक्षांना भेटण्यासाठी घेऊन आले होते. (प्रतिनिधी)