वेर्ले अपहार प्रकरणात बड्यांचा हात
By admin | Published: October 9, 2016 11:34 PM2016-10-09T23:34:36+5:302016-10-09T23:34:36+5:30
पोलिसांना संशय : उपसरपंचांचा जबाब नोंदवला
सावंतवाडी : वेर्ले येथील शौचालय घोटाळ््याप्रकरणी ग्रामसेवकासह सरपंचावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात आणखी काही बडे लोक असल्याचा संशय पोलिसांना असून, पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सरपंचासह ग्रामसेवक अटकेच्या भीतीने पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी वेर्लेचे तत्कालीन उपसरंपच चंद्रकांत राणे यांचा जबाब नोंदविला आहे.
वेर्ले येथील शौचालय घोटाळ््याप्रकरणी पंचायत समितीच्या तक्रारीवरून वेर्लेच्या बडतर्फ सरपंच प्रमिला मेस्त्री व ग्रामसेवक केतन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ३५ लाखांचा अपहार झाला असल्याचे पंचायत समितीने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात या दोघांव्यतिरिक्त अन्य काहींचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एक महिला एवढे धाडस करणार नसून, ग्रामसेवकाला हाताशी धरून अन्य सदस्यान किंवा पदाधिकाऱ्याने सह्या मारून हे पैसे उकळल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच प्रमिला मेस्त्री व केतन जाधव यांच्या मार्गावर होते. स्वत: पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांनी वेर्ले व वेंगुर्ले येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. पण आरोपी सापडले नाहीत.
रविवारी या अपहारप्रकरणी वेर्लेचे तत्कालीन उपसरपंच चंद्रकांत राणे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मात्र, जबाबात घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. अन्य काही सदस्यांचे तसेच या अपहाराशी थेट संबंध असणाऱ्या आणखी काहींचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचेही तपास अधिकारी जयदीप कळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)