कणकवली येथील प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपीला जामीन मंजूर
By सुधीर राणे | Published: May 10, 2024 03:46 PM2024-05-10T15:46:34+5:302024-05-10T15:47:01+5:30
कणकवली: कणकवली, सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पुर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील, ...
कणकवली: कणकवली, सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पुर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील, माऊलीनगर येथील महेंद्र गोपाळ चव्हाण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला.
१० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील माऊलीनगर येथील नागवे रोडवर तक्रारदार गौमत हिंदळेकर हा मित्र अल्पेश तांबेसह दुचाकीने ट्रॅव्हल बुकींगचे पैसे आणण्यासाठी जात होता. यावेळी घटने पूर्वीच्या पुर्ववैमनस्यातून समोरून गाडीतून आलेल्या आरोपी महेंद्र गोपाळ चव्हाण याने हुल दिली. यामुळे तक्रारदार व साक्षीदार गाडीसह खाली पडले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या खिशातील रेडियम कटरने गौतम हिंदळेकर याच्या १९ घातक वार केले होते. याप्रकरणी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीही उपचारार्थ रुग्णालयात असल्याने १३ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर आरोपी सावंतवाडी करागृहात होता. दरम्यान, त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव आणू नये. सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.