कुडाळ येथील बाळासाहेब ठाकरे आपला मोफत दवाखाना बंदच
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 2, 2024 05:50 PM2024-07-02T17:50:00+5:302024-07-02T17:50:40+5:30
वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात विचारला होता प्रश्न : अतुल बंगे यांनी केला पोलखोल
रजनीकांत कदम
कुडाळ : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू केलेले मोफत दवाखाने बंद आहेत असा प्रश्न अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी विचारला असता आमदार नितेश राणे यांनी यावर आक्षेप घेत दवाखाने सुरू असल्याचे म्हटले होते. यावर मंगळवारी कुडाळमधील शिवसैनिकांनी कुडाळ शहरातीलच दवाखान्याला कुलूप असल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा योग्यच होता, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अतुल बंगे यांनी सांगितले.
या प्रसिद्धीपत्रकात अतुल बंगे यांनी म्हटले की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची कुडाळ तालुका शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने किती सुरू आहेत, याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेनेचे अतुल बंगे यांनी विचारली असता सावंतवाडी आणि कणकवली असे दोनच दवाखाने सुरू आहेत; परंतु कुडाळमधला दवाखाना मराठी शाळेच्या इमारतीत होता; परंतु तो अद्याप सुरू नाही, असे स्पष्ट केले.
यावरून आमदार वैभव नाईक यांनी या आरोग्याच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न योग्य होता, असेही अमरसेन सावंत यांनी सांगितले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, तालुका शिवसेनाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.