बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:51 PM2020-06-25T16:51:05+5:302020-06-25T16:53:04+5:30
बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.
बांदा : यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.
काही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने केली जाणारी पारंपरिक नांगरणी कमी होताना दिसत आहे. जोत तसेच मजूर मिळत नसल्याने सध्या बहुतांश ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी केली जाते.
पाऊस पडल्याने डेगवे, तांबुळी, असनिये, मोरगांव परिसरात आंबा, काजू, नारळ, सुपारी कलम लागवड तसेच मशागत करण्यास सुरुवात झाली आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य पिकविले जाते. समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास यावर्षी भातशेतीला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सध्या भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी त्या कामात गुंतला आहे.
पावसाची काहीशी उघडीप
गेल्या आठवड्यात बांदा परिसरात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. भात लावणी करताना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
बदलत्या काळाबरोबर शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरली आहे. बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या नांगरणीची जागा आता यांत्रिकीकरणाने घेतली आहे.