आळंबीतून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर
By admin | Published: June 28, 2015 11:34 PM2015-06-28T23:34:03+5:302015-06-28T23:34:03+5:30
संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडीतील घटना
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथे विषारी आळंबी खाल्ल्याने तिघेजण गंभीर असून, त्यांच्यावर देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली.
रुपेश गुरव (वय १३), विलास गुरव (११) व बावा गुरव (२९) या तिघांनी रविवारी आळंबी खाल्ली. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. ते काही वेळाने दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रुपेश गुरव याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गावातील शिवराम गुरव, शुभम गुरव व विवेक गुरव या तिघांनी ही आळंबी आणून दिली होती. ती खाल्ल्यानंतर त्रास जाणवायला लागला.त्यामुळे त्यांना प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत संगमेश्वर पोलिसांनी या तिघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल एस. आर. नाईक व जी. आर. बोडेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)