निधी गैरव्यवहारप्रकरणी बांबुळी ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:06 PM2020-05-28T18:06:03+5:302020-05-28T18:06:53+5:30
कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.
कुडाळ गटविकास अधिकारी स्तरावरून आलेल्या चौकशी अहवालावर जिल्हा परिषद प्रशासनाचे समाधान न झाल्याने देवगड गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची चौकशी पूर्ण झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग निधीत अनियमितता असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते.
त्यानुसार चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर चौदाव्या वित्त आयोग निधीत अनियमितता आढळून आली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी बांबुळी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर याला ७ एप्रिल रोजी निलंबित केले होते.
बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग खात्यातील निधी काढण्यासाठी ग्रामसेवकासोबत सरपंच यांचीही स्वाक्षरी झालेली आहे. तरीही कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात सरपंचांना क्लीन चिट दिली होती.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी या चौकशीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चौकशी समितीने पारदर्शक चौकशी केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीची तटस्थ चौकशी होणे गरजेचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देवगड गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्रयस्थ चौकशी समिती पुन्हा नियुक्त केली होती.
बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीतील १० ते १५ लाख रुपये कोणतीही विकासकामे न करता परस्पर काढण्यात आले होते. त्यामुळे या ग्राम पंचायतीमध्ये मोठ्या स्वरूपाचा आर्थिक घोटाळा झाल्याचे पुढे आले होते.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून कुडाळ गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची चौकशी होवून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता.
आंबडपालमधील त्या कारभाराची चौकशी
निलंबित ग्रामसेवक कसालकर हे बांबुळी ग्रामपंचायतीपूर्वी कुडाळ तालुक्यातीलच आंबडपाल ग्रामपंचायतीत कार्यरत होते. तेथेही त्यांनी असाच प्रताप केला होता. लाखो रुपयांची अनियमितता होती. तेथे याबाबत तक्रार झाल्यानंतर त्यांची तेथून बांबुळी येथे बदली झाली होती. मात्र, तेथील असलेली अनियमिततेची रक्कम भरण्यासाठी त्यांनी बांबुळी ग्रामपंचायतीत पुन्हा तोच प्रकार केला.
तेथील रक्कम भरली. पण देवगड समितीने या आंबडपाल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवक कसालकर यांच्या कारभाराची चौकशी केली आहे. ग्रामसेवक यांनी ती रक्कम भरली असली तरी त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका राहण्याची शक्यता आहे.