गणेशोत्सवात मिरवणुकीवर बंदी : के. मंजुलक्ष्मी : मार्गदर्शक सूचना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:52 PM2020-08-12T16:52:03+5:302020-08-12T16:54:26+5:30
गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. तसेच आरती, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. तसेच आरती, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत. जिल्ह्यात येण्यासाठी एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या ई-पासची गरज भासणार नाही. इतर खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास सक्तीचा असेल. १२ आॅगस्टपर्यंत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना १० दिवस गृहअलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना कोणत्याही कोविड-१९च्या तपासणीची आवश्यकता नाही.
१२ आॅगस्टनंतर जे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत त्यांचा किमान ४८ तास आधी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच या व्यक्तींनी ३ दिवस घराबाहेर पडू नये. स्थानिक आरोग्य विभागाने त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करावी. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची नाक्यावरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात पल्स आॅक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, रॅपिड अँटीजेन टेस्ट किट तपासणी नाक्यावर उपलब्ध करून द्यावेत.
आजाराची लक्षणे असणाºया व्यक्ती, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्या बैठका घ्याव्यात. त्या बैठकीस गाव, प्रभाग नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे. गणेशोत्सव कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याचे नियोजन करावे व संबंधितांना याबाबत अवगत करावे.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवावी. सर्व तहसीलदारांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करावी. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तीची उंची ४ फूट तर घरगुती गणपती करिता मूर्ती २ फुटांची असेल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेश व संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक शारीरिक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाच्या अध्यक्षांनी करावी. मंडपात निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. श्री गणेशाचे दर्शन सुविधा आॅनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
उत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ नयेत. यंदा गणेशोत्सव कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. घरगुती गणपतीची पूजा शक्यतो स्वत:च करावी. पुरोहित (भटजी) यांनी जास्तीत जास्त आॅनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करावा.