कणकवली शहरात परप्रांतीय सलून कारागिराना प्रतिबंध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:39 PM2019-01-17T18:39:45+5:302019-01-17T18:40:59+5:30
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक सलून बंद करावी लागली आहेत. त्यामुळे अनेक नाभिक बांधव बेकार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह इतर भागात दाखल होणाऱ्या परप्रांतीय सलून कारागीराना प्रतिबंध करण्यात यावा. तसेच स्थानिक नाभिक बांधवाना बेरोजगार होण्यापासून वाचवावे.अशी मागणी एका निवेदनाद्वारे कणकवली तालुका नाभिक मंडळाच्यावतीने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कणकवली : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक सलून बंद करावी लागली आहेत. त्यामुळे अनेक नाभिक बांधव बेकार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह इतर भागात दाखल होणाऱ्या परप्रांतीय सलून कारागीराना प्रतिबंध करण्यात यावा. तसेच स्थानिक नाभिक बांधवाना बेरोजगार होण्यापासून वाचवावे.अशी मागणी एका निवेदनाद्वारे कणकवली तालुका नाभिक मंडळाच्यावतीने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान , वरील आशयाचे निवेदन नाभिक मंडळाच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकारी , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कणकवली तालुका व्यापारी महासंघ, कणकवली पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे.
यावेळी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, तालुका सचिव प्रवीण कुबल, खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण, महेश चव्हाण, सुमित लाड, संजय कुबल, अरुण चव्हाण, मनोज चव्हाण, सल्लागार सुभाष चव्हाण आदि संघटनेचे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्याने बरेचसे नाभिक बांधव विस्थापित झाले आहेत. काही नाभिक बांधवांना नवीन जागांची भाडी परवडत नसल्याने त्यांना आपला धंदाही करता येईनासा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. काहींनी हमाली सारखी कामे करून तात्पुरत्या स्वरुपात उदरनिर्वाह करण्याचे ठरवले आहे. असे घडत असताना जिल्ह्यातील कणकवलीसह काही तालुक्यांमध्ये परप्रांतीय सलून कारागीर ( भैय्या) लोकांचे आगमन झालेले आहे.
तसेच नाभिक समाजा व्यतिरिक्त इतर लोक आपल्या जागेच्या उपलब्धीनुसार सलून दुकाने थाटत आहेत. त्यात या भैय्यांना आणून ठेवले जात आहे. त्यामुळे या परप्रांतीयांनी सलून व्यवसायामध्येही चंचुप्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचा परिणाम येथील पारंपारिक नाभिक समाजावर पडत आहे. त्यांची रोजीरोटी देणाऱ्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. या गोष्टीचा वेळीच प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाने या परप्रांतीय भैय्या लोकांचा प्रतिकार करण्याचे ठरवले आहे. जेथे जेथे अनाभिक लोक अशा प्रकारे पार्लर उभारण्याचा प्रयत्न करतील त्यांनी फक्त आपल्या भागातील पारंपारिक नाभिकांना तेथे काम करण्यास ठेवल्यास नाभिक संघटनेचा त्यांना पाठींबा राहणार आहे.
जर त्यांनी नाभिक संघटनेला विश्वासात न घेता दुकाने थाटून त्यात परप्रांतीय भैय्या लोकांना आणून ठेवल्यास त्यास नाभिक संघटना कडाडून विरोध करणार आहे. यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन तसेच सलून थाटणारे नाभिक समाजा व्यतिरिक्त असलेले लोकच कारणीभूत असतील. असेही या निवेदन म्हटले आहे.