corona virus-कोरोनाच्या भीतीने कुणकेरी हुडोत्सवात बाहेरच्यांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:35 PM2020-03-16T12:35:38+5:302020-03-16T12:38:55+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शनिवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार राजाराम म्हात्रे व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कुणकेरी येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांना विनंती केली. त्याला ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. तर आठवडा बाजाराबाबत तहसीलदार नगरपालिकेला पत्र देणार आहेत.
कोरोना व्हायरसने जगात सर्वत्र थैमान घातले आहे. यातून भारत देशही सुटला नाही. भारतामधील अनेक शहरापर्यंत हा व्हायरस जाऊन पोहोचला असल्याने राज्य सरकारने अनेक खबरदारीचे उपाय म्हणून महत्त्वाची अशी गर्दीची ठिकाणे काही दिवसांसाठी बंद केली आहेत.
तसेच जत्रा, आठवडा बाजार आदी गर्दीच्या ठिकाणीही बंदी घातली आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रसिद्ध असा कुणकेरीचा हुडोत्सव असतो. पण या ठिकाणी गोवा तसेच कर्नाटक व जिल्ह्यातून अनेक लोक येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. याच भीतीने शनिवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी गावात जाऊन ग्रामस्थ, सरपंच व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत शासनाने जे निर्बंध आणले आहेत, त्यांची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे कुणकेरी हुडोत्सव काळात परिसरातील तीन गावांमधील सोडून बाहेरच्यांना कुणकेरी गावात हुडोत्सव काळात बंदी असणार आहे, असे जाहीर केले आहे.
कुणकेरी गावाच्या सीमेवर रविवारी सकाळपासून म्हणजे ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत बाहेरच्यांना बंदी असणार आहे, असे यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी जाहीर केले आहे. तर मंगळवार आठवडा बाजाराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुढील एक महिन्यासाठी हा आठवडा बाजारच बंद करण्यात आला आहे. बाजाराच्या निमित्ताने तब्बल दोन ते अडीच हजार नागरिक एकत्र येतात. यामध्ये बाहेरच्या लोकांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हा आठवडा बाजार आता एप्रिल अखेरपर्यंत शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणली तर सुरू केला जाईल, असे यावेळी म्हात्रे यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने हॉटेल तसेच व्यायामशाळा आदीबाबत गंभीर निर्णय घेण्यात येत असून, तशा नोटिसाही देण्यात येणार आहेत. आठवडा बाजाराबाबत नगरपालिकेला माहिती देण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.