अडल्या-नडल्यांना मिळतो संपदातार्इंचा भक्कम आधार
By admin | Published: March 7, 2016 11:22 PM2016-03-07T23:22:39+5:302016-03-08T00:44:59+5:30
समस्यांची सफाई : वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे--महिला दिन विशेष
शिवाजी गोरे -- दापोली --प्रत्येकजण स्वत:साठी जगत असतो. परंतु, समाजात दुसऱ्यांसाठी जगणारी माणसे फार कमी असतात. परंतु काही संवेदनशील माणसे दुसऱ्याच्या सुख-दु:खात समरस होऊन जगत असतात. अशाच एक संवेदनशील मनाच्या गृहिणी या सफाई कामगारांचे तळमळीचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्त्या संपदा पारकर ही नवी ओळख जन्माला आली आहे.
थोर समाजसेवक कर्मवीर दादा इदाते यांची कन्या होण्याचे भाग्य लाभलेल्या संपदा पारकर यांना बालपणीच कुटुंबात वडिलांकडूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाले आहे. वडिलांचा समाजसेवेचा वारसा मिळालेल्या संपदा पारकर या कर्मवीर दादा इदाते यांचा वारसा चालवत असून, एक गहिणी ते संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या ही नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
सखी समुपदेशन केंद्र महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार निवारणाचे काम त्या करत आहेत. महिलांवरील होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे, पीडित महिला तरुणांना न्याय मिळवून देणे, पीडित महिलांचे मनोधैर्य वाढवणे, हुंडाबळी, बालविवाह रोखणे, बेटी बचाव बेटी पढावचा समाजात प्रचार व प्रसार करणे, खास करुन महिलांमध्ये जागृती करण्याचे काम त्या करत आहेत. रात्री-अपरात्री कोणत्याही स्त्रीवर प्रसंग आला की त्या धावून येतात. पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय येथे नित्यनेमाने आढळून येणाऱ्या सर्वांच्या लाडक्या संपदाताई दिसल्या की, महिलांना आधार वाटतो.
सफाई कामगारांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर आहे. या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संपदा पारकर यांनी सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर, सफाई कामगार मेळावा घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सफाई कामगार राष्ट्रीय आयोग अध्यक्षा डॉ. मीनाकुमारी महतो (दिल्ली) यांच्याकडे यासाठी नियमित पाठपुरावा केला आहे.
स्वच्छ भारत मिशनचा महत्त्वपूर्ण घटक असलेला सफाई कामगार शासन दरबारी दुर्लक्षित असल्याने त्यांना न्याय मिळावा, यासाठी राष्ट्रीय सफाई आयोगाकडे पाठरुावा सुरु असून, डॉ. महतो यांनी सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. दापोलीत काही दिवसांपूर्वी त्या कोकणातील नगर पालिकांच्या बैठकीसाठी आल्या होत्या. सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महतो यांच्यामार्फत आपले प्रयत्न सुरु आहेत.
- संपदा पारकर, सामाजिक कार्यकर्त्या