बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:25 PM2023-01-23T18:25:02+5:302023-01-23T18:25:31+5:30

पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात

Bank fraud of 5 lakh 31 thousand, Kudal police arrested four people | बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात 

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कुडाळ : सोन्याचे दागिने असल्याचे भासवून कुडाळ येथील इको बँकेमध्ये ५ लाख ३१ हजार रुपयांचे सोने तारण कर्ज घेणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील स्नेहा सज्जन नारकर (३१) यांच्यासह चौघांना कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट सोन्याचे दागिने कर्ज तारण ठेवून त्याद्वारे रक्कम घेणारी प्रकरणे उघड होत आहेत.

कुडाळ येथील इको बँकेमध्ये १२ जानेवारी रोजी वैभववाडी-कोकिसरे नारकरवाडी येथील स्नेहा सज्जन नारकर यांनी १७ तोळे १ ग्रॅमचे दागिने ठेवले. या दागिन्यांवर सोने तारण कर्ज मंजूर करून स्नेहा नारकर यांच्या बँक खाती ५ लाख ३१ हजार रुपये बँकेने जमा केले. ही रक्कम जमा झाल्यानंतर २१ जानेवारी रोजी स्नेहा नारकर यांच्यासह वैभवी विष्णू पाटील (२४, रा. हातकणंगले, कोल्हापूर), सौरभ सुभाष गुरव (२४, रा. करवीर, कोल्हापूर), साई दिलीप कांबळे (२८, रा. करवीर, कोल्हापूर) हे सर्वजण कुडाळ येथील इको बँकमध्ये सोने तारण कर्ज घेण्यासाठी दाखल झाले.

बँकेजवळ १३ तोळे २ ग्रॅम एवढे दागिने दिले. बँकेचे नियुक्त केलेले सोनार यांनी या दागिन्यांची पडताळणी केली असता, हे दागिने बनावट असल्याचे दिसून आले. दरम्यान, याची पडताळणी केली असता हे दागिने बनावट असल्यामुळे १२ जानेवारी रोजी दिलेल्या दागिन्यांची तपासणी करण्यात आल्यावर ते दागिनेसुद्धा बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी कुडाळ पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार स्नेहा नारकर, वैभवी पाटील, सौरभ गुरव, साई कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवार २२ जानेवारी रोजी चौघांनाही कुडाळ न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी  २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये तपासिक पोलिस उपनिरीक्षक एम. डी. पाटील यांनी सांगितले की, याप्रकरणी यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? तसेच या प्रकरणासाठी वापरलेली गाडी याचा तपास करायचा असल्यामुळे पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. त्यामुळे पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात उपनिरीक्षक एम. डी. पाटील यांच्यासह एस. आर. तांबे काम पाहत आहेत.

मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस

या बनावट दागिन्यांप्रकरणी कोल्हापूर येथील एक सोनार असल्याचे उघड झाले आहे. बनावट दागिने बनवून त्यावर सोन्याचा मुलामा लावून हे दागिने खरे असल्याचे भासविले जात होते. सध्या बँकांमध्ये दागिन्यांची तपासणी ही नियुक्त केलेल्या सोनारांबरोबरच दागिने स्कॅन करून हे दागिने खरे असल्याचे मशीनद्वारे निश्चित केले जाते आणि त्याचाच फायदा या टोळीने घेतला. दरम्यान, बनावट सोन्याचे दागिने बनवणाऱ्या त्या आरोपीच्या शोधात कुडाळ पोलिस असून त्या आरोपीचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Bank fraud of 5 lakh 31 thousand, Kudal police arrested four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.