बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा ‘सहकार’कडेच
By admin | Published: May 8, 2015 12:04 AM2015-05-08T00:04:37+5:302015-05-08T00:07:19+5:30
‘सहकार’ला १५ जागा : शिवसेनेला पाच; चोरगेंचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा
रत्नागिरी : जिल्हा बॅँक निवडणुकीत मतदारांनी सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा सहकार पॅनेलच्याच हाती सोपविल्या आहेत. २१ पैकी २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलला १५ जागांवर विजय मिळाला असून, बिनविरोध निवड झालेल्या एका जागेमुळे सहकारच्या संचालकांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी चोरगे पुन्हा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतवेळी दोन संचालक असलेल्या शिवसेनेने मुसंडी मारत पाच जागा पटकावल्या.
गुरुवारी सकाळी आठ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात बॅँक निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर तासाभरात पहिले सात निकाल लागले. त्यात शिवसेनेला चार जागा मिळाल्याने शिवसंकल्प पॅनेलचा हुरूप वाढला आणि काही काळ सत्ताधारी सहकार पॅनेलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, त्यानंतर सहकार पॅनेलची अनेक जागांवर सरशी झाली. सेनेच्या जागा चारवरून पाचपर्यंतच पोहोचल्या, तर सहकार पॅनेलने तीन जागांवरून १६ जागांपर्यंत मजल मारली. जिल्हा बॅँकेत आता शिवसंकल्पच्या पाच संचालकांमुळे प्रबळ विरोधी पक्ष उदयास आला आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलला १९, तर शिवसेनेला ९ जागांची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही बाजूंचा राजकीय अंदाज मतदारांनी चुकवला आहे. रत्नागिरी, लांजा, गुहागर, दापोली या चार तालुका कृषी मतदारसंघांत व जिल्ह्याच्या दुग्ध मतदारसंघात शिवसेनेने मुसंडी मारली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय रेडीज, उद्योजक किरण सामंत, जयवंत जालगावकर, अॅड. दीपक पटवर्धन यांचा प्रमुख विजयी उमेदवारांत समावेश आहे.
सहकारच्या गुहागर व लांजा या खात्रीच्या जागा शिवसंकल्पने जिंकून सहकार पॅनेलला धक्का दिला आहे. गुहागरमधून सहकारचे विद्यमान संचालक भालचंद्र बिर्जे
यांना शिवसंकल्पचे अनिल जोशी यांनी पराभूत केले.
लांजा मतदारसंघातून शिवसंकल्पच्या आदेश आंबोळकर यांनी सहकारच्या सुरेश साळुंखेंचा पराभव केला. मात्र, ज्या जागेवर जिंकण्याबाबत शिवसेनेला आशा होती, त्या संगमेश्वर मतदारसंघातून सहकार पॅनेलने आपली जागा दुप्पट मतांनी राखली. येथून सहकारचे राजेंद्र सुर्वे हे ३१ मते मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी विलास चाळके यांना केवळ १७ मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बी. के. पाटील यांनी काम पाहिले.
चोरगेंची अनुपस्थिती जाणवली
मतमोजणी सुरू असताना सहकार पॅनेलचे सर्व नेते उपस्थित होते. मात्र, विद्यमान अध्यक्ष व पॅनेलप्रमुख डॉ. तानाजी चोरगे रुग्णालयीन उपचारांमुळे अनुपस्थित होते.
उपाध्यक्ष बाबाजी जाधव व शेखर निकम हे यावेळी सर्व धुरा वाहत होते.
मतमोजणीच्या ठिकाणी माजी
राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, आमदार उदय सामंत, आदी उपस्थित होते.
ननिवडणुकीतील नाती-गोती...
जिल्हा बॅँक निवडणुकीत माजी राज्यमंत्री, सध्या राष्ट्रवादीत असलेले रवींद्र माने यांची पत्नी नेहा माने तसेच आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे विजयी झाले.
मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांची पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रचना महाडिक यांचा महिला राखीव मतदारसंघात पराभव झाला.