शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच बँकेची धोरणे
By admin | Published: August 6, 2015 10:02 PM2015-08-06T22:02:51+5:302015-08-06T22:02:51+5:30
सतीश सावंत : जिल्हा बँकेच्या दोडामार्ग शाखेतील ‘झरे २ पुनर्वसन’च्या विस्तारित शंभराव्या सेवेचे उद्घाटन
कसई दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विस्तार जिल्ह्यात झपाट्याने होत आहे. सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला सर्व सेवा बँकेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक धोरणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी सांघिक काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोडामार्ग शाखेच्या झरे २ पुनर्वसन विस्तारित शंभराव्या सेवेचा उद्घाटन सोहळा बुधवारी सरगवे खंडोबा सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योगधंदे आणण्यासाठी या बँकेच्यावतीने प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील काजू जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रोसेसिंग प्रत्येक तालुक्यात व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांनी परप्रांतीयांना विकल्या. तेथे परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात रबर लागवड केली आहे. स्वत:च्या जमिनी न विकता स्वत: शेतकऱ्यांनी रबर लागवडीकडे वळावे. यासाठी जिल्हा बँक सहकार्य करेल. येत्या सप्टेंबर, आॅक्टोबर दरम्यान आजारपणाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना १००० रुपयांमध्ये ५०,००० रुपयांची औषधोपचारासाठी आर्थिक मदत इन्शुरन्सच्या माध्यमातून देण्यासाठी नवीन योजना अमलात आणली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक प्रकाश गवस, डॉ. प्रसाद देवधर, आदींनी मनोगते व्यक्त केले. यावेळी सतीश सावंत, सुरेश दळवी, आदींसह सहकारी संचालक, प्रगतशील शेतकरी, तालुक्यातील विविध सोसायटींचे चेअरमन, सदस्य, काजू, केळी बागायतदारांचा शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सहसंचालक प्रकाश गवस, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, झरे २ सरपंच अपर्णा आयनोडकर, झरेबांबर सरपंच सुरेखा जंगले, पाल पुनर्वसन झरे २ सरपंच गीतांजली राणे, संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, नूतन अध्यक्ष प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, कृतिका सुतार, विलास सावंत, सह्याद्री विकास संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर देसाई, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)