बापट यांच्याकडून झाडाझडती!

By admin | Published: June 25, 2015 11:23 PM2015-06-25T23:23:01+5:302015-06-25T23:23:01+5:30

राजापुरात भेट : गोदामाची अचानक पाहणी

Bapat planted! | बापट यांच्याकडून झाडाझडती!

बापट यांच्याकडून झाडाझडती!

Next

राजापूर : आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने प्रसिद्ध असणारे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी रात्री ८ वाजता अचानक राजापुरातील रेशनिंगच्या गोडावूनला भेट दिली व तेथील विदारक दृष्याची पाहणी केली. अत्यंत जुनाट असलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवा. तात्काळ निधी उपलब्ध करुन देतो असे आश्वासन देणाऱ्या बापट यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याची चर्चा नंतर सुरु होती.
सिंधुदुर्ग दौऱ्यावरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या नियोजित दौऱ्यात राजापूर भेट नव्हती. मात्र अचानक त्यांनी याबबात कुणाला कसलीच माहिती न देता राजापूरच्या हद्दीत प्रवेश केल्यावर अचानक येथील शासकीय गोदामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. जे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ते सर्व तात्काळ मंत्र्यांसमवेत गोदामाजवळ हजर झाले. ते सर्व तात्काळ मंत्र्यांसमवेत गोदामाजवळ हजर झाले. त्यामध्ये प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, पुरवठा विभागाचे अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता.
सर्वप्रथम अन्न पुरवठामंत्र्यांनी राजापूर पंचायत समितीच्या लगत असलेल्या गोदामांच्या इमारतींची पहाणी केली. स्वत: बापट यांनी त्या इमारतीत प्रवेश केला व ते थक्क झाले. इमारतीतील वीजपुरवठा बंद होता. इमारतीच्या खिडक्या उघड्या होत्या. आत अंधाराचेच साम्राज्य होते. आजवर कुठल्याच अन्न नागरी पुरवठा मंत्र्याने राजापुरातील गोदामांना कधीच भेट दिलेली नव्हती. त्यामुळे येथील गैरव्यवस्था कधीच पुढे आली नव्हती. तथापि, गिरीष बापट यांनी अचानक दिलेल्या भेटीने शासकीय गोदामांची काय परिस्थिती आहे, याचे दर्शन घडले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व माहिती घेतली. ते करीत असताना संबंधित जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील त्यांनी चांगलेच झापले, अशी चर्चा मंत्री जाताच राजापूर शहरात सुरु होती.
या जीर्ण झालेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी सुधारीत आराखडा पाठवून द्या. तात्काळ मंजुरी देतो, असे आश्वासन गिरीष बापट यांनी दिले. त्यामुळे जीर्णावस्थेकडे चाललेल्या राजापुरातील शासकीय गोदामांचे रुपडे आगामी काळात बदलेल अशी आशा आता पुरवठा विभागाकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

विदारक दृश्य...!
गोडाऊनमध्ये प्रवेश करताच बापट झाले थक्क.
इमारतीमधील वीजपुरवठाही बंद.
उघड्या खिडक्या, अंधाराचे साम्राज्य.
मंत्र्याने गोदामाला भेट देण्याची राजापुरातील पहिलीच वेळ.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही बापट यांनी साधला संवाद.
जीर्ण इमारतीच्या डागडुजीसाठी सुधारित आराखडा पाठवून देण्याचे आदेश.
गोडाऊनचे रुपडे पालटण्याची आशा.

Web Title: Bapat planted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.