बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

By सुधीर राणे | Published: May 4, 2023 04:54 PM2023-05-04T16:54:32+5:302023-05-04T17:05:01+5:30

सत्तेसाठी लाचार झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला

Barsuot major casualty, High level inquiry into Nilesh Rane statement, demands MP Vinayak Raut | बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

googlenewsNext

कणकवली: बारसू येथे मोठा घातपात होण्याची शक्यता आहे, जिलेटिन स्फोटके येत आहेत' असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. केवळ उद्धव ठाकरे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटण्यासाठी बारसू येथे येत असल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे नीलेश राणेंची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी  खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

कणकवली विजय भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सत्तेसाठी रिफायनरी प्रकल्पाची दलाली

विनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार आहेत. जे उदय सामंत आणि राणे कुटुंबीय विनाकारण काळ्या मांजरीप्रमाणे या दौऱ्याच्या आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची लफडी पुढील काळात बाहेर काढणार आहे. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, रिफायनरी हा प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्यामुळे माझा त्याला विरोध असणार आहे. मात्र, आता सत्तेसाठी लाचारी झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.

नीलेश राणे उच्च स्तरीय चौकशी व्हावी 

बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांची वेदना ऐकण्यास उद्धव ठाकरे ६ मे  रोजी तिघे जाणार आहेत. त्यावेळी सर्व गावांतील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ येणार आहेत. लोक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांना भेटणार म्हणून भाजपाच्या काळ्या मांजरानी जिलेटीन स्फोटकांचा साठा आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. नीलेश राणे यांच्याकडे स्फोटकांची सखोल माहिती असेल तर त्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी.

४३ लोकांची सरकारने तडीपारी केली

आता त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त असून स्थानिक, जनता सायकल देखील नेऊ शकत नाही. नीलेश राणे आणि भाजपचे लोक या रिफायनरीची दलाली करीत आहेत. त्यादृष्टीने पोलिस अधिक्षकांनी याची दखल घ्यावी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष जावून स्थानिकांशी अद्याप संवाद साधन्याची हिमंत केलेली नाही. तेथील ४३ लोकांची सरकारने तडीपारी केली आहे, असा आरोप खासदर राऊत यांनी यावेळी केला.

उदय सामंतांकडून कोट्यवधीचा भ्रष्टाचार 

उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यापासून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करत आहेत. रत्नागिरीत ६० कोटीच्या त्यांच्याच कंपनीने केलेला रस्त्यावर आता १०० कोटीचा सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मुळात पाच वर्ष देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडे असताना हा प्रस्ताव कशासाठी?

आम्हाला धमक्या दिल्या आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्याचे उद्योग मंत्री ग्रामस्थांशी संवाद साधन्यासाठी गेले नाहीत. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांची चौकशी लावा. रिफायनरी होवो अथवा न होवो. पण लोकांचे डोके फोडायचे असा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.

रिफायनरीला विरोध नाही, पण.. - वैभव नाईक 

जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणाहून  राणेंना हाकलून लावण्यात आले. हे लोकांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे बारसू येथे येणार आहेत. त्यांना कोण अडविण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्याच पध्द्तीने उत्तर देणार आहे. मोर्चा काढला तर शिवसेना तेवढ्याच ताकदीने उत्तर देईल. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही गप्प बसणार नाही. रिफायनरीला आमचा विरोध कधीही नाही. आमचे म्हणणे आहे की, तेथील लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करा. आम्ही लोकांसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांना बारसू येथे येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

Web Title: Barsuot major casualty, High level inquiry into Nilesh Rane statement, demands MP Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.