जिल्ह्यात ३ लाख विद्यार्थ्यांना आधार
By admin | Published: April 29, 2015 10:13 PM2015-04-29T22:13:19+5:302015-04-30T00:31:08+5:30
जिल्हा परिषद : शिक्षण विभाग लागला कामाला
रत्नागिरी : प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमधील २ लाख ९८ हजार ९९० विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात येणार आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या यशस्वी अंमलबजावणीने शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये समाविष्ट करुन घेणे, ही महत्त्वाची समस्या होती. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी आधारकार्ड काढून उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये प्रवेश घेतलेले प्रत्येक बालकाचे आधारकार्ड व ते प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. आधारकार्ड मोहिमेस प्रारंभ झाला असून २६ जूनपर्यंत प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले जाणार आहे.
प्रत्येक बालकाच्या प्रवेशनोंदणी पंचीकेतील क्रमांक आधारकार्डशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकही बालक शालाबाह्य होणार नाही. २६ जूनपर्यंत १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश आल्याने तशा सूचना प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)