बावनदी पुलाला काठ्यांचा आधार
By admin | Published: January 3, 2016 12:41 AM2016-01-03T00:41:24+5:302016-01-03T00:41:24+5:30
मोठ्या दुर्घटनेची शक्यता : देवरूख - साखरपा मार्गावरील वाहतूक धोकादायक
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख - साखरपा मार्गावरील बावनदी पुलाच्या तुटलेल्या कठड्याला काठ्यांचा आधार देण्यात आला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
देवरुख - साखरपा मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे वाहनचालक याच मार्गाला अधिक पसंती देतात. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या गाड्या याच मार्गाने येतात. तसेच साखरपा परिसरातील नागरिकही कामानिमित्ताने याच मार्गाने देवरुखात येतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नियमीत गर्दी असते.
या मार्गावरील बावनदी पुलाचे कठडे तोडून काही महिन्यांपूर्वी एक ट्रक थेट नदीपात्रात कोसळला होता. सुदैवाने या अपघातातून ट्रकचालक बचावला होता. यावेळी ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. यानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काठ्यांचा आधार देण्यात आला होता. अद्यापही हा काठ्यांचा आधार कायम आहे. या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असल्यामुळे या पुलावर दुर्दैवाने अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी पुलाच्या कठड्याला असलेल्या काठ्यांच्या आधाराऐवजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सद्यस्थितीला पुलाच्या कठड्याला देण्यात आलेला काठ्यांचा आधार कमकुवत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ सिमेंट कठडा बांधणे आवश्यक आहे. (वार्ताहर)