शहीद जवानांच्या नावे गावांना मूलभूत सुविधा
By Admin | Published: March 20, 2016 12:28 AM2016-03-20T00:28:13+5:302016-03-20T00:28:13+5:30
वायकर : चिपळूणच्या एलईडी दिव्यास मंजुरी
रत्नागिरी : देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जिल्ह्यातील शहीद जवानांच्या गावी त्यांच्या नावे मूलभूत सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतला आहे. या सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याचबरोबर चिपळूणमध्ये रस्त्यावर एलईडी दिवे लावण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे.
शहीद जवानांच्या गौरवशाली कार्याच्या स्मृती जनतेच्या मनात कायम रहाव्यात यासाठी शहिदांच्या गावाला त्यांच्या नावाने मूलभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय वायकर यांनी घेतला आहे. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील भेलसई, चिरणी व कावळे (ता. खेड) येथील गावांना नावीन्यपूर्ण स्मशानशेड, कूपनलिका, सोलर लाईट तसेच आवश्यक इतरही मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
त्याचबरोबर चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार चिपळूणमधील रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ३.५० कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय वायकर यांनी घेतला आहे. शहरात एल. ई. डी स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून निधी मिळण्याचा प्रस्ताव चिपळूणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. या कामाच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाने तांत्रिक मंजुरी दिली आहे.
त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र नगरोत्थान अंतर्गत शहराला एल. ई. डी बसविण्यासाठी वायकर यांनी ३.५० कोटी मंजूर केले आहेत. जनसुविधातंर्गत काडवली (ता. खेड), कुंभारखणी (ता. संगमेश्वर), शृंगारतळी (ता. गुहागर), कसबा (ता. संगमेश्वर) येथे घाट बांधणे, तर भेलसई, कावळे, चिरणी, उधळे व शिव. बु (ता. खेड). ओळी कांबळेवाडी (ता. चिपळूण) येथे सौरऊर्जा पथदिवे बसविण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.