मालवणात मुसळधार; बाजारपेठेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 05:25 PM2019-09-05T17:25:51+5:302019-09-05T17:26:44+5:30
गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठेसही बसला असून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे.
मालवण : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठेसही बसला असून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे भाविक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. परिणामी बाजारपेठेत दरवर्षीसारखी होणारी उलाढाल ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.
हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पाच दिवसांच्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मित्रपरिवार एकमेकांच्या घरी जातात. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने गणेश दर्शन घेण्यासही भाविकांना अडचणीचे ठरत आहेत.
गणेशोत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासूनच बुधवारी तिसºया दिवशीही दोन-तीन तास सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मालवण तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ५५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. गुरामवाडी येथील गुराम व आचरा येथील मालवणकर यांच्या घरांची भिंत कोसळून नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे.