दिग्गजांसाठी अस्तित्वाची लढाई
By admin | Published: April 9, 2015 10:46 PM2015-04-09T22:46:45+5:302015-04-10T00:27:30+5:30
जिल्हा बँक निवडणूक : विक्रमी अर्ज दाखल, काँग्रेस आघाडी विरोधात सेना युतीमध्ये संघर्ष
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होत असलेल्या पुढील पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी १९ जागांकरीता १२५ उमेदवारांनी अर्ज भरले असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढे अर्ज पहिल्यांदाच आले असून ही निवडणूक जिल्ह्यातील काही दिग्गजांसाठी अस्तित्वाची ठरणार असल्याने यावेळी या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात शिवसेना-भाजपप्रणित युतीमध्ये होणार हे चित्र स्पष्ट होत आहे.
गेल्या सात वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरीता ५ मे रोजी होत असून या निवडणुकीसाठी १९ जागांकरीता १२५ जणांनी अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले आहेत.
शेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघात जास्त अर्ज
शेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघात सर्वात जास्त अर्ज आले असून यामध्ये कणकवली तालुक्यातून सतीश सावंत (एकच अर्ज), सावंतवाडी तालुक्यातून जॅकी सेलेस्तिन डिसोजा, अनंत पांढरे, मेघश्याम काजरेकर, गुरुप्रसाद नाईक, प्रकाश परब, दत्ताराम वारंग, घाब्रियल आल्मेडा, विकास नाईक, दोडामार्ग तालुक्यातून विकास सावंत, दिलीप मयेकर, मोहन देसाई, गणेशप्रसाद गवस, प्रकाश गवस, कुडाळ तालुक्यातून पुष्पसेन सावंत, संदीप राऊळ, राजन परब, प्रकाश मोर्ये, सुभाष मडव, वैभववाडी तालुक्यातून दिलीप रावराणे, दिगंबर पाटील, रमेश तावडे, वेंगुर्ला तालुक्यातून विद्याधर प्रभू, राजन गावडे, दत्ताराम नाईक, मनिष दळवी, मालवण तालुक्यातून आशिष परब, व्हिक्टर डान्टस, बाळकृष्ण कांबळी तर देवगड तालुक्यातून प्रकाश बोडस आणि अविनाश माणगांवकर यांचा समावेश आहे. शेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघाच्या सावंतवाडी निवडणुकीमध्ये दत्ताराम वारंग विरूद्ध प्रकाश परब अशी लढत रंगणार तर कुडाळमध्ये पुष्पसेन सावंत, प्रकाश मोर्ये व सुभाष मडव यांच्यात तिरंगी लढत रंगेल. मालवणमध्ये व्हिक्टर डान्टस, दोडामार्गमध्ये विकास सावंत, देवगडमध्ये प्रकाश बोडस यांचे भवितव्य ठरणार आहे. कणकवलीत एकच अर्ज सतीश सावंत यांचा असल्याने ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य मतदारसंघाचा विचार केल्यास एकूण पाच अर्ज आले असले तरी खरी लढत ही विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आत्माराम ओटवणेकर विरूद्ध नकुल पार्सेकर यांच्यात रंगणार आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघात खरी रंगत येणार आहे. कारण याठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विद्यमान संचालक विद्याप्रसाद बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे याचबरोबर रमण वायंगणकर, दिलीप आचरेकर या दिग्गजांमध्ये लढत होणार आहे.
गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढून संचालक तसेच जिल्हा बँक अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले राजन तेली यांनीही यंदा भाजपामधून नागरी सहकारी बँका-पतपुरवठा संस्था मतदारसंघातून अर्ज भरला असून त्यांच्या विरोधात सात उमेदवार असून तेली आपले संचालकपद टिकवू शकतील काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
अनेक दिग्गजांची कसोटी
या निवडणुकीत माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजन तेली, बँकेचे विद्यमान अध्यक्ष डी. बी. वारंग, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कमलताई परुळेकर, प्रकाश परब, विलास गावडे, संदीप कुडतरकर तसेच विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत अनेक दिग्गजांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित.
विकास सावंतांसाठी अटीतटीची लढत
विद्यमान संचालक विकास सावंत यांनी सभासद संस्था-व्यक्ती सभासद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्याकरीताही ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. विणकर गृहनिर्माण मतदारसंघातून विद्यमान संचालक आर. टी. मर्गज तर विमुक्त भटक्या जाती-जमातीमधून गुलाबराव चव्हाण, औद्योगिक उत्पादन संस्था मतदारसंघातून अतुल काळसेकर, प्रशांत सावंत, गजानन गावडे, मेघनाद धुरी रिंगणात आहेत.
आघाडी सोडून राहिलेले महायुतीत
काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली आघाडी असल्याचे जाहीर केले तर शिवसेना व भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना-भाजप तसेच सहकार क्षेत्रातील इतर समविचारी उमेदवारांना आपल्या युतीत घेऊन महायुती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे
समजते.