बीडीओ, ग्रामसेवक पुरस्कारापुरते
By admin | Published: November 23, 2015 11:38 PM2015-11-23T23:38:10+5:302015-11-24T00:29:00+5:30
अंकुश जाधव यांचा गंभीर आरोप : जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तळागाळापर्यंत आवश्यक ती प्रसिद्धी होत नसल्यामुळे लाभार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षा, वाहन चालक प्रशिक्षण यासह अन्य योजनांचे प्रस्ताव व जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त होत नसल्याचा आरोप सदस्य सुकन्या नरसुले यांनी सभेत केला. योजनांची प्रचार, प्रसिद्धीची जबाबदारी ही गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची आहे. असे असूनसुद्धा सामान्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. शासनाचे केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक काम करत असल्याचा सनसनाटी आरोप सभापती अंकुश जाधव यांनी करत त्यांच्यावर ताशेरे ओढले.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुकन्या नरसुले, सुरेश ढवळ, आस्था सर्पे, सुभाष नार्वेकर, धोंडू पवार, समिती सचिव तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलिंद जाधव, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
नियोजित वेळेपेक्षा सभा ४५ मिनिटे उशिराने सुरु झाल्याने सभापती अंकुश जाधव यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. सभेच्या सुरुवातीस जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सर्व प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाले का? असा सवाल सभापती जाधव यांनी विचारत प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये अपंगांना रोजगारासाठी निधी देणे, ताडपत्री, पावरस्प्रे, शेळीगट, गरीबांची घर दुरुस्ती आदी योजनांचे प्रस्ताव आल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
तर स्पर्धा परीक्षा व वाहनचालक जिल्हा कार्यालयाकडे फार थोड्या प्रमाणात प्राप्त झाल्याने सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. योजनांची प्रचार प्रसिद्धी योग्य रितीने होत नसल्याचा आरोप सुकन्या नरसुले यांनी केला. ाटविकास अधिकारी व ग्रामसेवक योजनाधारक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसून केवळ पुरस्कारांसाठी काम करत असल्याचा आरोप सभापती अंकुश जाधव यांनी केला. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक योग्य काम करत नसल्याने संबंधित योजनेचे प्रस्ताव फार कमी प्रमाणात येत आहेत. प्रस्ताव येण्यासाठी ठोस उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी सभापती जाधव यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना बैठकीसाठी बोलावणार असल्याचे सभागृहात सांगितले.
६० कलाकारांना मानधनाची प्रतिक्षा; ५ कलाकार मृत
सन २०१३ मध्ये वृद्ध कलाकारांच्या मानधनाचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना मानधन मिळावे यासाठी शासनाकडे पाठविण्यात आले. शासनाने या मानधनाला मंजुरी दिली. मात्र या ६० वृद्ध कलाकारांच्या खात्यात आजमितीपर्यंत मानधन जमा झालेले नाही. या ६० कलाकारांपैकी आजपर्यंत ५ कलाकार मृत झाले आहेत. कलाकारांचे मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी शासनाला स्मरणपत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
कारवाईचा ठराव : व्यसनमुक्ती समिती नाहीसन २०११ रोजी शासनाने शासन निर्णय जारी करत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्यसनमुक्ती’साठी समिती स्थापन करावी असे आदेश काढले होते. मात्र विशेष समाजकल्याण विभागाने या आदेशांची पायमल्ली करत २०१५ संपत आले तरी व्यसनमुक्ती समिती स्थापन न केल्याने या सभेत गरमागरम चर्चा घडली. जिल्ह्यात व्यसनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता ही समिती स्थापन होणे फार गरजेचे होते असे मत सुरेश ढवळ यांनी नोंदविले तर या विभागाचे जिल्ह्यात कोणतेही काम समाधानकारक नाही. सर्व कामे ही कागदी घोड्यांप्रमाणे नाचवली जात असल्याचा आरोप करत व्यसनमुक्ती समिती स्थापन न करणाऱ्या या विभागाविरोधात आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे सांगत तसा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. यावर विशेष समाजकल्याणचे अधिकारी यांनी येत्या आठ दिवसांत समिती स्थापन करणार असल्याचे सभागृहात सांगितले.
दशावतारी कलावंतांचा विमा उतरला जावा
कोकणची कला टिकविण्याचे कार्य सिंधुुदुर्गातील दशावतार कलाकार करत असतात. दशावतार कलाकारांना मानधन कमी असते.
त्यामुळे या क्षेत्रातील एखाद्या कलाकाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना थोडी फार मदत मिळावी.
यासाठी अशा कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले.